एक रुपयाचा वाद अन् २३ वर्षे कोर्टाच्या चकरा; कोर्टाने आरोपीच्या सुटकेचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:37 AM2024-06-28T07:37:07+5:302024-06-28T07:37:40+5:30
एक रुपयाच्या वादातून एका तरुणाला तब्बल २३ वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या.
बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : एक रुपयाच्या वादातून एका तरुणाला तब्बल २३ वर्षे कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या. एक रुपयाचा हा वाद २००१चा आहे. यात एका १८ वर्षांच्या तरुणाला दोन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा पुरेशी आहे असे म्हणत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने आता त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
राजू गुरांग नावाच्या तरुणाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १३ एप्रिल २००१ रोजी चंडीगडमध्ये त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरनुसार, त्याने विजय कुमारच्या दुकानात जाऊन सिगारेट खरेदी केली होती. यासोबतच त्याने तंबाखूचे पॅकेट घेतले. त्यासाठी विजयने त्याच्याकडे एक रुपयाची मागणी केली. मात्र, राजू गुरांग याच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने विजयने तंबाखूचे पॅकेट परत मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हाणामारीत त्याने विजयला लाथ मारली.
यात चंदीगड न्यायालयाने याचिकाकर्त्याला दोषी ठरवून या प्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मृत्यू होईल हे त्याला माहिती नव्हते, असे म्हणत कोर्टाने त्याची सुटका केली.