नोएडात खोकला आल्यामुळे एकाला मारली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:54 AM2020-04-16T05:54:42+5:302020-04-16T05:54:55+5:30
कोरोना विषाणूच्या संकटात विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. गौतम बुद्धनगर जिल्ह्यात अशीच एक विचित्र घटना घडली. ग्रेटर नोएडा परिसरातील दयानगर गावातील सेंथली मंदिराच्या
नवी दिल्ली : नोएडा परिसरात लुडो खेळताना एका व्यक्तीला खोकला आल्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्राने त्याच्यावर गोळी झाडली. कोरोनाच्या संशयाने बंदुकीची गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. यात एक जण जखमी झाला.
कोरोना विषाणूच्या संकटात विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. गौतम बुद्धनगर जिल्ह्यात अशीच एक विचित्र घटना घडली. ग्रेटर नोएडा परिसरातील दयानगर गावातील सेंथली मंदिराच्या ठिकाणी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चार जण लुडो हा खेळ खेळत होते. जय, वीर ऊर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत अशी त्यांची नावे आहेत. त्याचवेळी प्रशांतला खोकला आला. मात्र, प्रशांत हा खोकल्याद्वारे कोरोनाचा फैलाव करीत असल्याचे एका जणाने म्हटले. त्यावरून चारही मित्रांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. अखेर वीर ऊर्फ गुल्लू याने त्याच्याजवळील बंदूक बाहेर काढली. त्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. तरीही वाद न मिटल्याने वीरने प्रशांतच्या मांडीवर गोळी झाडली. यात प्रशांत हा जखमी झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशांतला नोएडातील कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, घाबरण्याचे काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी जारचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.