नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 09:55 PM2019-11-17T21:55:10+5:302019-11-17T21:55:42+5:30
या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जम्मू काश्मीर - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झीरो लाईनवर पाकिस्तानकडून आयईडी स्फोट करण्यात आला. या स्फोटात पेट्रोलिंग करणारा भारतीय जवान शहीद झाला आहे तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत.
या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर संपूर्ण नियंत्रण रेषेवर दक्षता वाढविण्यात आली आहे. मात्र या घटनेसंदर्भात लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य झालेले नाही. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे लष्कराचे सैनिक घेऊन सीमावर्ती चौकांवर जात होते. दरम्यान, पाकिस्तानकडून कच्च्या रस्त्यावर आयईडी लावण्यात आले. यावर चढताच वाहनाचा पुढील टायर फुटला, ज्यामुळे गाडीच्या पुढचा भाग छिनविछिन्न झाला. या वाहनात सैन्याचे 4 कर्मचारी प्रवास करत होते, त्यातील तीन गंभीर जखमी आहेत. हवालदार संतोष आणि नायक जिमाराम या दोन गंभीर जखमी सैनिकांना विमानाने आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
Jammu and Kashmir: Havaldar Santosh Kumar, a resident of Pura Bhadauria village in Agra, lost his life in a suspected IED blast in Akhnoor sector, earlier today. pic.twitter.com/Xse2ea6dx4
— ANI (@ANI) November 17, 2019
कमांड हॉस्पिटल उधमपूर येथे तैनात डॉक्टरांनी हवालदार संतोषला मृत घोषित केले. जिमाराम यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तिसरा जवान नायक कृष्णा प्रताप याच्यावर अखनूरच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एलओसीवर शोध मोहीम
घटनेनंतर एलओसीवर भारतीय जवानांना गस्त घालताना अतिरिक्त सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याकडे पाहता एलओसीवर इतरत्र असे कोणतेही आयईडी स्थापित केले गेले आहे की नाही हे शोधण्यासाठीही शोधमोहीम राबविण्यात आली. नियंत्रण रेषेवरील या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.