दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात- गृहमंत्री अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:02 AM2020-02-26T02:02:21+5:302020-02-26T02:02:43+5:30
आमदार - पोलिसांत समन्वय साधणार; शांतता समित्यांची गरज
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या ईशान्य भागात सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शहा यांच्या उपस्थितीत नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला, काँग्रेस नेते सुभाष चोप्रा, भाजपचे मनोज तिवारी, रामवीर बिदुडी, दिल्ली विधानसभेतील सर्व आमदार उपस्थित होते. पोलीस आणि आमदारांमध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे समजातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या शांतता समित्या स्थापन करण्याची गरज असल्याचेही शहा म्हणाले.
हिंसाचार झालेल्या भागात पोलीस कर्मचाऱ्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमारेषांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंसाचार सुरू असताना अफवा रोखण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्लीकर आणि प्रसारमाध्यमांनी अफवा रोखण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.
शांततेची सुनिश्चिती करा : अमित शहा
स्थानिक प्रतिनिधींनी तातडीने संवेदनशील भागांत बैठका घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे. नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.
हिंसाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकी दाखवल्याने शहा यांनी हे सकारात्मक चित्र असल्याचे म्हटले आहे.
सर्वपक्षीयांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत आणि हिंसाग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याची निश्चिती करावी, असेही शहा म्हणाले.