एक झाड ‘ग्रीन अहमदनगर’साठी !
By admin | Published: June 15, 2016 11:37 PM2016-06-15T23:37:00+5:302016-06-15T23:47:05+5:30
अहमदनगर : शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगरची ओळख बनली आहे.
अहमदनगर : शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगरची ओळख बनली आहे. यावर मात करत नगरला ‘ग्रीन सिटी’चा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने लोकसहभागातून ‘माय सिटी-माय ट्री’ हे अभियान हाती घेण्याचे ठरविले आहे. नागरिकांना झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे आवाहन या अभियानात केले जाणार आहे.
नगर शहराला सुंदर असा सीनाकाठ लाभला आहे. तसेच नगरची हवाही एकेकाळी प्रदूषणमुक्त मानली जात होती. मात्र, वाढत्या शहराच्या तुलनेत झाडांची संख्या घटल्याने शहराची ही ओळख लयास जाऊ लागली आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने लावलेले एक झाडही या शहराला शुद्ध हवा व सुंदर चेहरा मिळवून देऊ शकते. त्यामुळे ‘लोकमत’ने नगरकरांच्या सहभागातून हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानात विविध संस्था, संघटना, गणेश मंडळे, तालीम मंडळे, ज्येष्ठ नागरिक, शाळा, महाविद्यालये, औद्योगिक कंपन्या, हॉस्पिटल्स, हॉटेल्स या सर्वांनाच झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ज्या संस्थांची व नागरिकांची या अभियानात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क करावयाचा आहे. त्यांची झाडे लावण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. यासाठी ‘लोकमत’मध्ये ‘ग्रीन कक्ष’च स्थापन करण्यात आला आहे. या अभियानात संस्था व संघटना झाडे लावण्यासाठी मोकळे मैदान, शाळा, कॉलनी, रस्ते दत्तक घेऊ शकतात.
पैसा नको, इच्छाशक्ती हवी
एक झाड लावण्यासाठी खड्डा व रोपाचा खर्च मिळून साधारण दीडशे रुपये खर्च येतो. मात्र ‘माय सिटी-माय ट्री’ या मोहिमेत पैसे स्वीकारले जाणार नाहीत. रोख पैशांऐवजी रोपे, ट्री-गार्ड, पोयटा माती, श्रमदान अशी कृतिशील मदत करु शकता. संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, अपार्टमेंट, कॉलनी, औद्योगिक संस्था, हॉस्पिटल्स, हॉटेल्स यांनी झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारल्यास त्यांचा उपक्रम ‘लोकमत’ सर्व जनतेपर्यंत पोहोचवेल. अर्थात झाड मोठे होईपर्यंत या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी या संस्थांवर असेल.
अभियानासाठी आपण हे करु शकता?
तुमच्या संस्था संघटनेमार्फत स्वत: जागा निवडून झाडे लावू शकता.
झाडे लावण्यासाठी जागा सुचवा
रोपे,पोयटा, पाणी, खत यापैकी तुम्ही काहीही मदत देऊ शकता.
झाडांच्या संवर्धनासाठी ट्री-गार्ड दान करु शकता.
झाडे लावण्यासाठी तुमच्या संस्था, संघटनेतील किती लोक श्रमदान करु शकतात ते कळवा.