जुलैपासून एकाच पद्धतीचे वाहन परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:23 AM2018-10-15T06:23:07+5:302018-10-15T06:23:37+5:30
देशभरात समान नोंदणी प्रमाणपत्र : वाहनचालकाच्या अवयवदान संकल्पाच्या माहितीची नोंद
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या जुलैपासून एकाच पद्धतीचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) व वाहनचालक परवाने देण्यात येणार आहेत. त्यांचा रंग, स्वरूप व त्यावरील सुरक्षा वैशिष्ट्येही एकसारखीच असतील.
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या वाहन नोंदणी प्रमाणपत्र व वाहनचालक परवान्यांमध्ये मायक्रोचिप व क्यूआर बारकोड असणार आहे. त्यामध्ये असलेल्या निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) या वैशिष्ट्याद्वारे मेट्रो, एटीएम कार्डची माहिती साठविणे शक्य होईल. वाहनचालकाने केलेल्या अवयवदानाच्या संकल्पाची, तसेच दिव्यांग वाहनचालकासाठी विशेष पद्धतीने बनवून घेतलेल्या वाहनाची माहिती नव्या वाहनचालक परवान्यात संग्रहित करण्यात येईल.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनाच्या वायू उत्सर्जनाबाबतचे नियम आरसीमध्ये नमूद केले जातील. सध्या होणाऱ्या चाचणीत या नियमांबाबत चालकाला किती माहिती आहे, हे तपासले जाते.
कार्डमागे २० रुपयांचा वाढीव खर्च
- देशामध्ये सध्या दररोज सुमारे ३२ हजार वाहनचालक परवान्यांची व ४३ हजार आरसीची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली जाते.
- वाहतूक पोलीस किंवा अधिकाऱयांकडे असलेल्या उपकरणासोबत एखादे डिजिटल वाहनचालक परवाना किंवा आरसी कार्ड मॅच केले की, त्या वाहनाची व वाहनचालकाची सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होईल. ही सारी नवी वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक डिजिटल कार्डामागे फक्त १५ ते २० रुपयांचा खर्च वाढणार आहे.
- संपूर्ण देशभर एकाच पद्धतीचे वाहनचालक परवाने, आरसी कार्ड देण्याच्या कामाची तयारी ठरविलेल्या मुदतीत पूर्ण होईल, असा विश्वास भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला.