एक हटवणार गुजरातची दारूबंदी, दुसरा मिशीवर ताव देऊन मागतोय मते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:47 PM2022-12-02T12:47:25+5:302022-12-02T12:48:30+5:30
एक आहे सॉफ्टवेअर अभियंता, तर दुसरा निवृत्त लष्करी अधिकारी
यदु जोशी
गांधीनगर : गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मला आमदार करा, मी दारूबंदी हटवून दाखवतो, असे सांगत एक सॉफ्टवेअर डेव्हलपर निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरला आहे. त्याचे नाव नरेश प्रियदर्शी. तर मिशीवर ताव देत मगनभाई सोळंकी हे माजी लष्करी अधिकारीही मत मागत आहेत.
नरेश प्रियदर्शी यांची हिंमतही मोठी आहे. अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून त्याने दंड थोपटले आहेत ते थेट मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याविरोधात. भाजपसाठी अत्यंत सुरक्षित असा हा मतदारसंघ. दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे होत नाही. दुसरीकडे शेकडो कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर राज्य सरकारला पाणी सोडावे लागते. विषारी किंवा निकृष्ट दारू पिऊन अनेक लोक दरवर्षी मरतात. मग अशी दारूबंदी काय कामाची? ती हटविलेलीच बरी असा नरेश यांचा आग्रह आहे. दारूची बाटली हे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण उपलब्ध अडीचशे चिन्हांमध्ये दारूची बाटली नव्हती.
दारूबंदी हटवू म्हणणारा हा आहे भाजप उमेदवार
लाधू पारघी हे बनासकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. त्यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले की, ते निवडून आल्यानंतर ते दांतामधील दारूबंदी हटविल्याशिवाय राहणार नाहीत. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत तसेच मतदारांना लालूच दाखविल्याबद्दल कलम १७१ ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या उलट गणतीचा काॅंग्रेसकडून डिजिटल बोर्ड
अहमदाबादच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर एक बोर्ड लावला आहे. राज्यातील भाजप सरकारचे दिवस भरले असल्याचा विश्वास त्यातून व्यक्त केला आहे. या डिजिटल बोर्डवर भाजप सरकार जायला किती दिवस, किती तास आणि किती मिनिटे बाकी आहेत याचे आकडे त्यावर बदलत राहतात. राजस्थानमधील गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत असाच डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता आणि त्यापूर्वी तेथे असलेले भाजपचे सरकार सत्तेतून गेले होते.
मुछे हो तो मगनभाई जैसी...
५७ वर्षीय मगनभाई सोळंकी हे आगळेवेगळे उमेदवार अपक्ष म्हणून साबरकांठा जिल्ह्याच्या हिंमतनगर मतदारसंघात भाग्य अजमावित आहेत. त्यांची मिशी आहे अडीच फूट लांब. २०१२ मध्ये लष्करातून निवृत्त झाले. पिळदार, लांब मिशी ठेवण्याचा त्यांना छंद आहे.
२०१७ मध्ये ते बहुजन समाज पार्टीकडून विधानसभा लढले, मग २०१९ मध्ये अपक्ष म्हणूनही लढले. आपण निवडून आलो तर लांब मिशा ठेवण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यावे असा आग्रह सरकारकडे धरू, असे त्यांनी प्रचारादरम्यान लोकमतला सांगितले. या ठिकाणी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.