एक वर्षाच्या मुलीच्या पोटात ३.५ किलो वजनाचा गर्भ!
By admin | Published: August 9, 2016 03:04 AM2016-08-09T03:04:43+5:302016-08-09T03:04:43+5:30
एक वर्ष वयाच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढल्याची वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत विरळा मानली जाणारी घटना येथे घडली असून ३.५ किलो वजनाचा हा गर्भ शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर आता
कोईमतूर : एक वर्ष वयाच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढल्याची वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत विरळा मानली जाणारी घटना येथे घडली असून ३.५ किलो वजनाचा हा गर्भ शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर आता त्या मुलीची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे.
शहराच्या मेत्तुपलयम भागातील श्री गणपती कृष्णा हॉस्पिटल या खासगी इस्पितळात बालरोग तज्ज्ञ व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणारे शल्यविशारद डॉ. डी. विजयगिरी यांनी शनिवारी ही शस्त्रक्रिया केली. गर्भासह या मुलीचे वजन आठ किलो होते. म्हणजेच जवळजवळ तिच्या वजाएवढाच गर्भ तिच्या पोटात वाढला होता. परिणामी तिचा रक्तपुरवठा व अन्नातून मिळणारी पोषणद्रव्ये गर्भाने शोषून घेतल्याने तिची वाढ खुंटली होती. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता ती चांगली बरी होत आहे.
रोजंदारीवर मोलमजुरी करणाऱ्या राजू आणि सुमती या दाम्पत्याची ही मुलगी आहे. वर्षभरापूर्वी इरोडमधील गोबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचा जन्म झाला. जन्मत:च या मुलीचे पोट नेहमीपेक्षा मोठे होते. पालकांनी त्याकडे लक्ष दिले नाही व डॉक्टरांनीही वेळीच सीटी स्कॅन न केल्याने त्यांच्याही कदाचित लक्षात आले नाही. पण शेवटी या मुलीला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला, ती नीट जेवेनाशी झाली व पोटाचा आकार आणखीनच वाढला तेव्हा तिला एका खासगी डॉक्टरकडे नेले. कदाचित पोटात मांसाची गाठ किंवा ट्युमर असावा, असे वाटल्याने त्या डॉक्टरने पालकांना कोईमतूरला पाठविले.
डॉ. विजयगिरी यांच्या सांगण्यानुसार त्यांनाही प्रथम ट्युमरचाच संशय आला. परंतु अल्ट्रासाऊंड स्कॅन काढल्यावर पोटात नुसता मांसाचा गोळा नसून त्यात अर्धवट विकसित झालेले अवयव, हाडे व पेशीसमूहही असल्याचे लक्षात आले. वैद्यकीय साहित्याचे संदर्भ घेतले असता या मुलीच्या पोटात कदाचित गर्भ वाढला असावा, अशी शंका बळावली. परंतु शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्यावरच त्याची नेमकी खात्री पटली.
डॉ. विजयगिरी यांनी सांगितले की, एवढ्या लहान मुलीच्या पोटातून एवढा मोठा गोळा शस्त्रक्रियेने वेगळा काढणे सोपे नव्हते. डावे मूत्रपिंड या गर्भाला पूर्णपणे चिकटलेले होते. पित्ताशय, प्लीहा आणि स्वादूपिंडाचा डावा भागही या गोळ््याला चिकटलेला होता. गर्भामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळेही तयार झालेले होते व त्याच्या वाढीमुळे ओटीपोटातील अवयव दाबले गेलेले होते. अवयवांना इजा होऊ न देता आणि प्रत्येक रक्तवाहिनी अलगदपणे बाजूला करून हा गर्भाचा गोळा काढवा लागला. एकदा तो बाहेर काढल्यावर मोकळ््या झालेल्या जागेत इतर अवयव त्यांच्या योग्य जागी ठाकठीक केले गेले. (वृत्तसंस्था)