दिवाळीपूर्वी कांदा महागला, भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:29 PM2023-10-27T17:29:09+5:302023-10-27T17:34:11+5:30
Onion Price Hike: नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वी काही ठिकाणी कांद्याची किंमत वाढून ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-एनसीआरसह वेगवेगळ्या शहरांमध्ये २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले.
कांद्यांच्या वाढत्या दरांबाबत सरकारनं सांगितलं की, कांद्याची सरासरी किंमत वाढून ४७ रुपये किलो स्तरावर पोहोचला आहे. कांद्याच्या वाढत्या दरांपासून दिलासा देण्यासाठी बाजारामध्ये २५ रुपये किलो दराने बफर स्टॉकमधून विक्री वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक विषयक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कांद्याची देशभरातील सरासरी किंमत ४७ रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याचा दर ३० रुपये प्रतिकिलो होती.
केंद्राच्या ग्राहक विषयक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही ऑगस्टपासून बफर स्टॉकमधून कांदा देत आहोत. यामुळे किमतीमधील वाढ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये किमतीत वाढ होत आहे तिथे घावूक आणि किरकोळ दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांदा दिला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून विविध ठिकाणी बफर स्टॉकमधून सुमारे १.७ लाख टन कांदा देण्यात आल आहे.
किरकोळ बाजारांमध्ये बफर स्टॉकमधील कांदा दोन सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेड यांच्या दुकानांमधून आणि वाहनांमधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दरामध्ये विकला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवामानासंबंधीची कारणं आणि खरीप हंगामात कांद्याचं उशिरा पीक घेतल्याने कमी उत्पादन झालं आहे. तसेच पीक बाजारात येण्यास उशीर होत आहे.