कांदा निर्यातीवरील बंदी १५ मार्चपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:33 AM2020-03-04T05:33:33+5:302020-03-04T05:33:39+5:30
सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन तो २०० रूपये किलोपर्यंत गेल्यावर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात राहायला मदत झाली. याचबरोबर सरकारने तुर्की, अफगाणिस्तानसह अनेक देशांतून कांदा आयात केला. परंतु, तेथील कांदा आकाराने मोठा होता, त्याला भारतीय कांद्याची चव नव्हती, त्याचा जास्त वापर हा सलाडसाठी होत असल्यामुळे भारतात या कांद्याचा फार उपयोग झाला नाही.
सरकारचे म्हणणे असे आहे की, कांद्याचे मार्च महिन्यात जोरदार पीक झाले आहे. हे पीक गेल्या वर्षीच्या ४० लाख टन पिकाच्या जवळपास ४० टक्के जास्त आहे. यामुळे मंड्यांमध्ये त्यांची आवक जास्त झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बºयाच स्थिर झाल्या. या पार्श्वभूमीवर निर्यातीवर आणखी बंदी तर्कसंगत नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रूपये किलोपर्यंत आला आहे. हा भाव मार्चमधील कांद्याच्या पिकानंतर आणखी कमी होईल. याशिवाय भारतीय बाजारात कांद्याची
उपलब्धता आमच्या मागणीपेक्षा बरीच जास्त असेल.