कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 01:10 PM2023-08-22T13:10:35+5:302023-08-22T13:11:12+5:30

केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.  

Onion procurement will start from today, more will be procured if required - Piyush Goyal | कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल

कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल

googlenewsNext

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.  

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आजपासूनच सुरू करण्यात येत असल्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली आहे. याचबरोबर, केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी देखील नाफेड व एनसीसीएफमार्फत राज्यातील तीन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केलेला आहे. त्याचबरोबर आता आणखी दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून कांद्याचे भाव उत्पादक व खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने संतुलित राहतील, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील तसेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे ,असेही यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले.  

दरम्यान,  कांद्यावर 40 टक्के टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे भाव पडतील की काय, या भीतीने महाराष्ट्रातील पेटलेल्या कांदा प्रश्नावर मंगळवारी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. यावेळी आपण पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही पीयूष गोयल यांना फोन आले, त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केला जावा, याबाबत आग्रही विनंती केली, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्यातील कांदा खरेदी करण्याबाबत घोषणा केली, तसेच 2410 रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कांदा खरेदीस तात्काळ सुरुवात देखील केली, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच, केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती देखील आम्ही केली आहे. मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Web Title: Onion procurement will start from today, more will be procured if required - Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.