सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:31 PM2024-09-14T19:31:15+5:302024-09-14T19:31:37+5:30

Onion Rate Hike: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे.

Onion Rate Hike: The government's election calculations will cost the common man, onion may go up to Rs.100 | सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. असे असले तरी हा निर्णय कांद्याचा दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंद घातली होती. यामुळे नाशिक पट्ट्यातील शेतकरी भाजपवर प्रचंड नाराज झाले होते. याचा फटका महायुतीला लोकसभेत बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा रोष विधानसभेलाही अंगावर येऊ नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका देशभरातील नागरिकांना बसणार आहे. 

कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. यामुळे संतापलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील भाजी मंडई, व्यापार बंद ठेवला होता. यानंतर केंद्राने मे २०२४ मध्ये पुन्हा किमान निर्यात मूल्याची अट 50 डॉलर प्रति टन एवढी घातली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आजही केंद्र सरकारवर नाराज आहेत. 

देशात कांद्याचे दर ६० ते ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आदेश जारी करत एनसीसीएफ आणि नाफेडला विविध शहरांमध्ये 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचे आदेश दिले आहेत. बाजारात कांद्याचे भाव पडले की सरकार गायब होते आणि वाढले की ते दर कोसळविण्यासाठी कमी दराने कांदा बाजारात आणते, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जात नाही, असा आरोप या संघटनांनी केला आहे. 

यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा महायुतीला धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा हा राग शांत करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मुल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा परदेशात विकतील आणि देशातील बाजारात कमी प्रतीचा, कमी प्रमाणावर कांदा उपलब्ध होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

नवीन कांद्याचे पीक येण्यास अद्याप दोन-तीन महिने लागणार आहेत. साठविलेला कांदा परदेशात विकला जाणार असल्याने देशातील कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, यामुळे मागणी वाढल्याने गेल्या १५-२० दिवसांत कांद्याचे दर वाढू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Onion Rate Hike: The government's election calculations will cost the common man, onion may go up to Rs.100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.