कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 09:51 AM2019-09-29T09:51:03+5:302019-09-29T09:51:15+5:30
नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीः नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे. दिल्लीतली सर्वात मोठ्या आझादपूर मंडई समितीच्या मते, गेल्या वर्षी कांद्याच्या मागणीमध्ये 23 टक्क्यांची कपात आली होती. तर दुसरीकडे मंडई व्यावसायिकांच्या मते कांद्याच्या मागणीत 50 टक्क्यांपर्यंत कपात येत असते. परंतु मागणी कमी झाली तरी त्याचा सरळ प्रभाव किमतींवर पडत नाही, असा दावा ओनियन ट्रेडर्स असोसिएशनच्या श्रीकांत मिश्रा यांनी केला आहे.
नवरात्रीत कांद्याच्या मागणीत 50 टक्क्यांनी कमी येण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची चिन्हे फारच कमी आहेत. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचत नसल्यानं राजधानीत कांद्याचे भाव जैसे थेच राहण्याची शक्यता आहे. कांद्याच्या उत्पादनाला मुसळधार पाऊस मारक ठरत आहे. दिल्लीत कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. दिल्ली सरकारनं व्यापाऱ्यांना सांगितलं की, फक्त चार ट्रक कांदा दिल्लीत आल्यानं काहीही फरक पडणार नाही.
दररोज 35-40 ट्रक कांद्याची आवक गरजेची आहे. आझादपूर भाजी मंडईतल्या व्यापाऱ्यांच्या मते, येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीत कांद्याची आवक कमी होणार आहे. अशातच कांद्याच्या आवकमध्ये 25 टक्के कमी आल्यास कांद्याची घाऊक बाजारात किंमत 35-48 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तसेच किरकोळ बाजारात तोच कांदा 80 रुपयांच्या वर जाऊ शकतो. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीत कांद्याच्या आवकमध्ये कपात आली आहे.