रिलायन्स जिओच्या सीम कार्डवर कांदा, तूरडाळ आयुष्यभर मोफत
By admin | Published: September 1, 2016 03:03 PM2016-09-01T15:03:28+5:302016-09-01T15:06:01+5:30
यापुढच्या काळात फक्त डेटासाठी पैसे पडतील. बाकी सगळं फ्री मिळेल. आमचं तर उद्दिष्ट आहे कि रिलायन्सच्या ग्राहकांना दिवाळीला उटणंदेखील विकत घ्यायला लागू नये.
Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओची 4जी सेवा लाँच करताना कर लो ग्राहक मुठ्ठीमे साठी ऑफर्सची लयलूट केली आहे. भागधारकांशी संवाद साधताना अंबानी यांनी आपल्या योजनांची जंत्री सादर केली, ज्यामध्ये काही योजना लाँच केल्या आहेत तर काही योजना भविष्यकाळात दाखल करण्यात येणार आहेत. अंबानींनी केलेल्या भाषणाचा व घोषणांचा गोषवारा...
यापुढच्या काळात फक्त डेटासाठी पैसे पडतील. बाकी सगळं फ्री मिळेल. आमचं तर उद्दिष्ट आहे कि रिलायन्सच्या ग्राहकांना दिवाळीला उटणंदेखील विकत घ्यायला लागू नये. सध्या सुरुवातीला देशातील सर्वसामान्यांची जी महागाईमुळे परवड होत आहे, ती टाळण्यासाठी जो ग्राहक वार्षिक 15 हजार रुपयांची जिओची सेवा घेईल, त्याला पुढील सेवा मोफत मिळतिल.
- अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, अनलिमिटेड मेसेज, महिन्याला पाच किलो तूरडाळ व 10 किलो कांदे मोफत.
सध्या रिलायन्सचं लक्ष्य 10 कोटी ग्राहकांचं आहे. ते साध्य झाल्यानंतर या, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर, पहिल्या 10 कोटी ग्राहकांपैकी 15 हजारांची सेवा घेतलेल्या ग्राहकांना लाइफटाइमसाठी दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल.
प्ले स्टोअरमध्ये रिलायन्स खाओ नावाचा ऑप्शन असेल त्यामध्ये रिलायन्सच्या ग्राहकांना काय मोफत मिळेल व काय अत्यल्प दरात मिळेल याची माहिती दिलेली आहे.
नजीकच्या काळात रिलायन्स पियो हा ऑप्शन सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये गोमूत्र, कडुनिंबाचा रस, तुळशीचा रस, आवळ्याचा रस असे अनेक पर्याय देण्यात येणार असून त्यासाठी पतंजलीशी बोलणी सुरू आहेत.
विवाहमंडळांच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. जिओच्या तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांना मोफत देण्यासाठी साथी पाओ ही सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे. संभाव्य जोडीदाराची संपूर्ण केवायसी रिलायन्सकडे असल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाहीशी होणार आहे.
देशभरातले 10 कोटी ग्राहक रिलायन्सशी जोडली गेल्यानंतर पर्यटनक्षेत्रातल्या व्यक्तिंना पर्यटकांशी जोडणारी रिलायन्स जाओ ही सेवादेखील आपण देणार आहोत. त्यामुळे कुठल्याही मध्यस्थाखेरीज रिलायन्स जिओचे ग्राहक देशभरातल्या कुठल्याही पर्यटनस्थळी जाण्याचं बुकिंग फोनवर करू शकतात.
प्रिय भागधारकांनो, रिलायन्स जिओ तुम्ही सांगाल ती सेवा देण्यास सक्षम असेल. माझी तर अशी योजना आहे, की भविष्यकाळात लोकांचा पगार रिलायन्स जिओमध्येच जमा होईल. खाओ, पिओ, जाओ, साथी पाओ सारख्या असंख्य सेवा फक्त ग्राहकांनी उपभोगायच्या. पगाराप्रमाणे, आपोआप प्लॅन निवडला जाईल, प्लॅननुसार आपोआप सेवा ग्राहकाला मिळतिल, पैसे सिल्लक राहिलेच तर रिलायन्स इन्व्हेस्टमेंट त्या पैशांची रिलायन्स फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गुंतवणूक करेल.
जसजसं अंबानींचं भाषण रंगत होतं, तस तसा एकेकाचा बाजार उठत होता... आधी आयडिया सेल्युलर व भारती एअरटेलचं भागभांडवल 13 हजार कोटी रपयांनी घसरलं आणि नंतर देशभरातल्या कांदा व तूरडाळ व्यापाऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करायचे इशारे दिले आहेत.
अंबानींच्या या मनसुब्यानंतर काही राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:
नरेंद्र मोदी - माझं सरकार सगळ्यांशी एकाच न्यायाने वागेल. जे पर्याय रिलायन्ससाठी खुले आहेत, तेच पर्याय आयडिया, भारती एअरटेल वा अगदी शेतकऱ्यांसाठीही खुले आहेत.
अरविंद केजरीवाल - देशभरात एकहाती सत्ता रहावी आणि विरोधकच राहू नयेत यासाठी नरेंद्र मोदीच अंबानींच्या आडून रिलायन्स चालवतात, हा माझा आरोप आज सिद्ध झाला आहे. रिलायन्सचे 10 कोटी ग्राहक म्हणजे मोदींचे किमान 20 कोटी मतदार असा सरळ हिशोब आहे, या विरोधात आम्ही जंतरमंतर आंदोलन करणार.
शरद पवार - ते भाषण नीट वाचायला हवं. रिलायन्स तूरडाळ व कांदे आयात करणार आहेत की आपल्या शेतकऱ्यांकडून घेणार हे स्पष्ट झालेलं नाही. मला शंका येतेय की लोकांच्या मनात आपला हिंदुत्ववादी अजेंडा उतरवण्यासाठी RSS ने रचलेली ही खेळी आहे.
राज ठाकरे - कांदे व तूरडाळ मोफत वाटणार असतील तर आमच्या मराठी शेतकऱ्यांनी गोट्या खेळायच्या का? आणि मासे व कोंबडी खाणाऱ्यांनी काय घोडं मारलंय. अंबानी त्यांचा शाकाहार ग्राहकांच्या का गळ्यात मारतात... त्यांनी हवं तर रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र प्यावं, पण रिलायन्स पियो मध्ये बीअर का नाही? मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून जिओवर बंदी आणण्यासाठी अध्यादेश काढण्याची विनंती करणार आहे.
उद्धव ठाकरे - किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे रे रिलायन्सच्या फोनचा?
राहूल गांधी - दलितांना रिलायन्स 4जी सेवा मोफत देणारेत की नाही ते आधी अंबानींनी जाहीर करावं. देशातल्या गरीबांना, मागासांना आणखी मागास ठेवण्याची आणि श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याची नरेंद्र मोदींची जी खेळी आहे, त्याचाच एक भाग म्हणजे रिलायन्स जिओ आहे.
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)