Crime: तरुणीने मंजूळ आवाजात माजी अधिकाऱ्याला केला फोन, अन् लुटले ४८ लाख, नेमका काय प्रकार? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:15 PM2023-08-03T14:15:29+5:302023-08-03T14:16:24+5:30
Online Fraud: सायबर क्राईमची नवनवी प्रकरणे हल्ली समोर येत आहेत. त्यासाठी गुन्हेगारांकडून नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकजण यांच्या जाळ्यात फसत आहेत.
सायबर क्राईमची नवनवी प्रकरणे हल्ली समोर येत आहेत. त्यासाठी गुन्हेगारांकडून नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकजण यांच्या जाळ्यात फसत आहेत. आता नवा धक्कादायक प्रकार दिल्लीतून समोर आला आहे. येथे गृहमंत्रालयातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला ४८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगारांनी यासाठी एका मॅजिक अॅपचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी एका बनावट मुलीच्या आवाजाचा वापर करण्यात आला.
आरोपींनी मुलीचा आवाज काढून ती या अधिकाऱ्याच्या वर्गमित्राची मुलगी असल्याचा दावा केला. तसेच मदत मागून त्यांची फसवणूक केली. मात्र दक्षिण दिल्लीतील सायबर सेलने वेगाने सुत्रे हलवत या टोळीचा पर्दाफाश केला. तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुमन कुमार, आशीष कुमार, विवेक कुमार, अभिषेक कुमार आणि एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी सुमन कुमार सराईत असून, त्याने डाबर कंपनीच्या संचालकांनाही ११ कोटी रुपयांचा गंडा घातला होता.
दक्षिण दिल्ली पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, मालवीयनगर मध्ये राहणाऱ्या गृहमंत्रालयातील निवृत्त अधिकारी देवेंद्र कुमार ठाकूर यांनी सायबर ठाणे प्रभारी अरुण कुमार वर्मा यांच्याकडे ८ जुलै रोजी तक्रार केली होती. मला आरोही झा नावाच्या एका मुलीचा फोन आला होता. तसेच तिने स्वत:ची ओळख माझ्या एका वर्गमित्राची मुलगी अशी करून दिली होती.
या अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केल्यानंतर या तरुणीने तिची आई आजारी असून, ती रुग्णालयात असल्याचे सांगितले. तसेच तिच्या आईवरील उपचारांसाठी मदत मागितली. त्यानंतर ती कोणत्या ना कोणत्या कारणाने ती पैसे मागू लागली. मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींच्या टोळीचा म्होरक्या असलेल्या सुमन कुमार याने बीसीएची पदवी मिळवली आहे. त्याने एका महिलेला नोकरीवर ठेवले होते. तसेच हे आरोपी स्कॅम करतात, हे समजल्यावर ती सुद्धा यामध्ये सहभागी झाले.
या प्रकरणात वापरण्यात आलेले मॅजिक कॉल अॅप हे युझर्सला वेगवेगळ्या आवाजामध्ये बोलण्याची सुविधा देते. त्याबरोबरच एका अतिरिक्त बॅकग्राऊंड कॉलचा वापर केला जाऊ शकतो. या प्रकारच्या अॅपच्या माध्यमातून अनेक लोकांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे.