आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन
By admin | Published: November 7, 2015 03:25 AM2015-11-07T03:25:17+5:302015-11-07T03:25:17+5:30
आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन करणारी प्रणाली आयकर विभाग सुरू करील आणि अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यासोबत भ्रष्टाचारही रोखता
नवी दिल्ली : आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन करणारी प्रणाली आयकर विभाग सुरू करील आणि अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यासोबत भ्रष्टाचारही रोखता येईल अशा पद्धतीने कामकाज व्यवस्थेत बदल करील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते येथे ‘दिल्ली इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्ह २०१५’ चे उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनाला देशातील व विदेशातील अर्थतज्ज्ञ उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, सरकारने प्रामाणिक करदात्यांच्या सेवेसाठी अनेक पावले उचलली आहेत. यावर्षी इलेक्ट्रॉनिक रिटर्नची तपासणी व अन्य कामे ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली. हेच प्रमाण गेल्यावर्षी ४६ टक्के होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, अधिकाऱ्यांसाठी कामकाजाच्या पद्धतीतच बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे बदल असे असले पाहिजेत की, अधिकाऱ्याने दिलेले आदेश किंवा त्याला झालेले विषयाचे आकलन हे अपिलात योग्य सिद्ध झाले की नाही.
यामुळे भ्रष्टाचार रोखला जाईल व योग्य ते आदेश देण्याला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. केवळ रिटर्न दाखल करणेच नाही तर त्याच्या तपासणीचे कामही आॅनलाईनच होईल अशी प्रणाली आयकर विभाग लागू करील, त्यामुळे करदात्याला आयकर कार्यालयात यायची गरज पडणार नाही, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आॅनलाईन ईमेलद्वारे प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्यांची उत्तरेही दिली जाऊ शकतात. कोणता विषय कोणाकडे किती दिवसांपासून प्रलंबित आहे हे माहिती व्हायला हवे. पाच मोठ्या शहरांमध्ये या व्यवस्थेची चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सगळ्या कर रिटर्नपैकी ८५ टक्के रिटर्न आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केले जात आहेत. आयकर विभागाने आधारचा वापर करून ई-सत्यापन (व्हेरिफिकेशन) सुरू केले आहे. ४० लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी या सुविधेचा वापर केला आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक रिटर्ननंतर कागदपत्रांचीही तपासणी व्हायची व त्यात कित्येक आठवडे लागायचे.
१०,५०० कोटी रुपये देशात आणले
गेल्या १७ महिन्यांत चलनवाढ आणि विदेशी गुंतवणुकीसह सगळ्या निकषांवर अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे, असे मोदी यांनी म्हटले. आर्थिक सुधारणा या केवळ प्रसार माध्यमांत मथळे मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वसमावेशक अशा असल्या पाहिजेत यावर मोदी यांनी भर दिला. विदेशात दडवून ठेवण्यात आलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून १०,५०० कोटी रुपये देशात आणता आले, असेही मोदी म्हणाले.
आम्ही १७ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलो तेव्हाच्या तुलनेत आमची कामगिरी चांगली आहे. सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढले असून चलनवाढ खाली आली आहे. विदेशी गुंतवणूक वाढली असून चालू खात्यावरील तूट घटली आहे. महसूल वाढला असून तूट कमी झाली आहे आणि रुपया स्थिर आहे.