३,७०० कोटींचा आॅनलाईन गंडा
By admin | Published: February 4, 2017 01:13 AM2017-02-04T01:13:41+5:302017-02-04T01:13:41+5:30
नोएडामध्ये बोगस कंपनी काढून साडेसहा लाख लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून ३,७०० कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील तीन जणांना गजाआड करण्यात आले.
लखनौ : नोएडामध्ये बोगस कंपनी काढून साडेसहा लाख लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून ३,७०० कोटी रुपये उकळणाऱ्या टोळीतील तीन जणांना गजाआड करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ही कारवाई केली.
एसटीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, नोएडातअब्लेज इन्फो सोल्युशन्स प्रा.लि. नामक कंपनी काढून त्याद्वारे लोकांची फसवणूक करण्यात आली. ही कंपनी आधी ‘सोशल ट्रेड डॉट बिज’ या आॅनलाईन पोर्टलद्वारे चालविण्यात आली. नंतर ती वेगळ्या नावाने चालविण्यात आली. कंपनीचे संचालक अनुभव मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर प्रसाद व तंत्रज्ञान प्रमुख महेश दयाल यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नोएडाच्या सूरजपूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीची कॅनडा बँकेतील तीन खाती बंद करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये ५२० कोटी रुपयांहून अधिक रक्कम आहे.
वेबसाईटच्या माध्यमातून घरबसल्या सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून या कंपनीने गुंतवणूकदारांना चुना लावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील कंपन्यांच्या खात्यांमध्ये फारच कमी कालावधीत खूप मोठी रक्कम जमा झाली.
या कारस्थानातील एक आरोपी संचालक अनुभव मित्तल बीटेक पदवीधर आहे. तर, श्रीधर प्रसाद हा एमबीए आहे. कंपनीच्या प्रसारासाठी व्टिटर आणि फेसबूकचाही उपयोग करण्यात येत होता. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत २५० पासपोर्ट जप्त केले आहेत. कॉल सेंटर अथवा अन्य प्रकारच्या कंपनीच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार नोएडात वाढले आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, या तिघांनी २०१५ मध्ये ही पिरामिड स्कीम सुरु केली. घरी बसून पैसे कमाविण्याचे आमिष या योजनांमधून दिले गेले. सदस्यत्वासाठी या कंपनीकडून ५७५० ते ११५०० रुपये आणि २८७५० ते ५७५०० रुपये घेतले जात होते. या गुंतवणूकदारांना यूजर आयडी आणि पासवर्ड दिला जात होता. नोएडात सेक्टर ६३ मध्ये एक चार मजली इमारत त्यांनी किरायाने घेतली होती.
बँका बदलल्याने संशय
विशेष बाब म्हणजे या कंपनीचे खाते काही महिन्यांमध्येच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत वारंवार हलवले जात होते. याबाबत अधिक चौकशी केली असता कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल असल्याचे पुढे आले. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. आता पुढील चौकशी सुरू असून, अटक केलेल्या तिघांच्या आणखी साथीदारांचा शोध घेतला जात आहे.