ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल ५ दिवस बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:05 PM2024-08-30T13:05:19+5:302024-08-30T13:05:36+5:30
या कालावधीत पासपोर्टच्या कामांसाठी भेटीच्या वेळा देण्यात येणार नाहीत तसेच आधी दिलेल्या भेटीच्या वेळांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तांत्रिक देखभालीसाठी ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले असून पुढील पाच दिवस म्हणजे २ सप्टेंबरपर्यंत ते बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पासपोर्टच्या कामांसाठी भेटीच्या वेळा देण्यात येणार नाहीत तसेच आधी दिलेल्या भेटीच्या वेळांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत.
पासपोर्ट सेवा पोर्टलवरील निवेदनात म्हटले आहे की, दि.२९ ऑगस्टला रात्री ८ वाजेपासून पासपोर्ट सेवा पोर्टलचे काम बंद ठेवण्यात येईल. २ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत तेथे पासपोर्ट सेवा उपलब्ध नसेल. शुक्रवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी ज्यांना पासपोर्ट कामासाठी याआधीच भेटीची वेळ दिली असेल त्यात फेरबदल करण्यात येणार आहेत. सुधारित वेळ संबंधितांना नंतर कळविली जाणार आहे.
परराष्ट्र खात्याच्या अख्यत्यारित पासपोर्ट सेवा येते. त्या खात्यातील सूत्रांनी सांगितले की, तांत्रिक देखभालीसाठी पोर्टलचे काम काही दिवस बंद ठेवण्यात येते. हा नेहमीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.
असे चालते पासपोर्ट सेवा केंद्राचे काम
देशभरातील पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये या पोर्टलच्या साहाय्यानेच काम चालते. या सेवा केंद्रांत कागदपत्रांची बारकाईने तपासणी होते. त्यानंतर पोलिसांकडून त्या व्यक्तीच्या माहितीची पडताळणी केली जाते. अर्ज केल्याच्या ३० ते ४५ दिवसांत संबंधिताला पासपोर्ट दिला जातो.