नोटाबंदीमुळे आॅनलाइन पेमेंटची चलती!

By admin | Published: November 16, 2016 12:29 AM2016-11-16T00:29:13+5:302016-11-16T01:40:06+5:30

काळा पैशाविरोधातील मोहीम तीव्र करत, पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आॅनलाइन व्यवहारांकडे

Online payment due to non-voting! | नोटाबंदीमुळे आॅनलाइन पेमेंटची चलती!

नोटाबंदीमुळे आॅनलाइन पेमेंटची चलती!

Next

नवी दिल्ली : काळा पैशाविरोधातील मोहीम तीव्र करत, पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आॅनलाइन व्यवहारांकडे लोकांचा कल वाढला असून, मोबाइलद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांच्या संख्येमध्ये तब्बल ७०० टक्के वाढ झाली आहे. उलाढाल तब्बल दहा पटींनी वाढली आहे.
या नोटाकोंडीचा फायदा घेण्यासाठी आॅनलाइन पमेंट आणि मोबाइल पेमेंट सुविधा देणाऱ्या कंपन्यांनी अनेक आॅफर्स आणल्या आहेत. मोबीक्विकने कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क आकारणार नसल्याचे  जाहीर केले आहे. अशा आॅफर्समुळे किरकोळ विक्रेते, दुकानदार,  तसेच ग्राहक मोबाइल वॉलेट्सचा वापर वाढवतील, अशी आशा आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी, आम्ही बँक ट्रान्सफर व्यवहार मोफत ठेवले आहेत, असे मोबीक्विकचे सहसंस्थापक बिपीन प्रीत सिंग यांनी सांगितले. या पूर्वी मोबाइल वॉलेटमधून बँकेत पैसे ट्रान्सफर करताना, ज्यांनी केवायसी (नो युवर कस्टमर) ची पूर्तता केली असेल, अशांसाठी १ टक्का तर नॉन- केवायसी युझर्ससाठी ४ टक्के फी आकारण्यात येत असे. ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, मोबीक्विकच्या व्यवहारांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
-मोबाइल वॉलेट कंपन्यांमध्ये आघाडीचे नाव असलेल्या ‘पेटीएम’ने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून, आठवडाभराच्या कालावधीत २४ हजार कोटी रुपयांचे एकूण ५० लाख व्यवहार झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत पेटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७०० टक्के वाढली असून, प्रत्यक्ष उलाढाल १००० टक्के वाढल्याचे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.
-या कालावधीत अ‍ॅप डाउनलोड्सची संख्या ३०० टक्के वाढली आहे, तसेच प्रत्येक ग्राहकाचे आठवड्याला सरासरी तीन व्यवहार होत, जे वाढून आता १८वर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे.
-असोचेमच्या निष्कर्षानुसार सध्या मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वर्षाला ३ अब्ज व्यवहार होतात, जे पुढील सहा वर्षांमध्ये ९० टक्क्यांच्या चक्रवाढ गतीने वाढत १५३ अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचतील.


एटीएममधून लवकरच मिळणार ५0 आणि २0 च्या नोटा-
मुंबई : एटीएममधून लवकरच ५0 आणि २0 रुपयांच्या नोटाही मिळू लागतील, अशी माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली. एका मुलाखतीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, एसबीआयच्या दक्षिण भारतातील शाखांतील कामाचा बोजा ५0 टक्क्यांनी घटला आहे. याचाच अर्थ, आपल्याला पैसे नक्की मिळणार आहेत, अशी लोकांची खात्री झाली आहे. एटीएममध्ये पैसे लवकर संपत असल्यामुळे लोकांना गैरसोय होत आहे, हे खरे आहे.
एटीएम यंत्रात ठरावीक संख्येनेच शंभराच्या नोटा ठेवता येतात. या मर्यादेमुळे एटीएममधील पैसे लवकर संपत आहेत. याशिवाय एटीएम रिकामे झाल्यानंतर, त्यात पुन्हा पैसे भरण्याची प्रक्रिया स्वयंचलित नाही. मानवी हातांनी हे काम करावे लागते. लोक येऊन पैसे भरायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे गैरसोय होत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत या समस्येवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोंधळ कमी झाल्यास ५0 व २0 रुपयांच्या नोटाही एटीएममधून देण्याची व्यवस्था आम्ही करू.
एटीएम पुनर्भरण प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची प्रक्रिया लांबणार नाही, हे हा टास्क फोर्स पाहीलच. त्याचबरोबर, एटीएम पूर्ण क्षमतेने चालेल, यासाठीही उपाययोजना करील. २000 रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळायला आज किंवा उद्यापासून सुरुवात होईल.


पाचव्या दिवशीही सराफा दुकाने बंद; आयकर छाप्यांची छाया -
आयकर खात्याकडून तपासणी करण्यात आल्यामुळे, घाबरलेल्या दिल्लीतील सराफा व्यापाऱ्यांनी राजधानी दिल्लीत मंगळवारी सलग पाचव्या दिवशी दुकाने बंद ठेवली. सराफा व्यापारी बेकायदेशीर व्यवहार करून, हजार-पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारत असल्याच्या माहितीवरून, १0 नोव्हेंबर रोजी दिल्ली राजधानी क्षेत्रातील दरिबा कलान, चांदणी चौक आणि करोल बाग यांसह चार ठिकाणी छापे मारले होते.
त्यामुळे सराफा बाजारात भीतीचे वातावरण आहे. कटकट नको, म्हणून व्यापाऱ्यांनी ११ नोव्हेंबरपासून दुकानेच बंद ठेवली आहेत. केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, विक्रीचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Online payment due to non-voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.