चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 10:38 AM2019-07-03T10:38:05+5:302019-07-03T10:39:59+5:30
चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे.
श्रीहरिकोटा - भारताची दुसरी चांद्र मोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोने कंबर कसली आहे. 14 आणि 15 जुलैदरम्यान रात्री दोन वाजता चांद्रयान -2 चे प्रक्षेपण होणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे. ज्यांना चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण पाहायचे आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची सोय इस्रोने केली असून, आज मध्यरात्रीपासून इस्रोच्या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येणार आहे.
सध्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. मंगळवारी चांद्रयान-2 ची रेडिओ फ्रिक्वेंसी तपासण्यात आली. तसेच इक्विमेंट-बे कॅमेराही लावण्यात आला. तसेच सर्व पेलोड्सच्या असेंब्लिंगचीही तपासणी करण्यात आली. 14 जून रोजी यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर येथून चांद्रयान-2 चे ऑर्बिटर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात पाठवण्याता आले होते. हे ऑर्बिटर 15 जून रोजी श्रीहरिकोटा येथील लाँच पोर्टवर पोहोचले होते.
🇮🇳 #ISROMissions 🇮🇳#Chandrayaan2#GSLV
— ISRO (@isro) July 2, 2019
Online registration process for witnessing the forthcoming GSLV MKIII-M1 / Chandrayaan-2 mission will commence @ 00:00 hrs on July 4th 2019
इस्रोची दुसरी चांद्रमोहीम असलेले चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या 2 क्रेटर मॅजिनस सी आणि सिंपेलिनस एन यांच्यामध्ये असलेल्या मैदानी प्रदेशात हे यान उतरणार आहे. या प्रदेशामध्ये याआधी कुठल्याही देशाने आपली चांद्रमोहीम आखलेली नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील हा भाग नेहमी अंधारात असतो. त्यामुळे येथे पाणी असण्याची शक्यता अधिक आहे. त्याबरोबरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील क्रेटर हे खूप थंड आहेत. त्यामुळे सौरमालेबाबतचे काही जुने जिवाश्म मिळण्याची शक्यता आधिक आहे.