आॅनलाइनचा बँकांना धोका
By admin | Published: June 10, 2017 03:25 AM2017-06-10T03:25:21+5:302017-06-10T03:25:21+5:30
इंटरनेटवर आधारित कमी खर्चातील आर्थिक व्यवहार तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढणारी व्यावसायिक कार्यक्षमता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इंटरनेटवर आधारित कमी खर्चातील आर्थिक व्यवहार तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाढणारी व्यावसायिक कार्यक्षमता यामुळे येत्या पाच ते सहा वर्षांत फिजिकल बँका संपतील, असे वक्तव्य नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले आहे.
कांत यांनी सांगितले की, माझ्या मते येत्या पाच ते सहा वर्षांत आपण फिजिकल बँकांचा मृत्यू पाहू शकू. येत्या काळात फिजिकल बँकांना टिकून राहणे कठीण आहे. आॅनलाइन बँकिंग साधनांच्या तुलनेत त्यांचा खर्च इतका अफाट असेल, की त्यांना अस्तित्व टिकवून ठेवणेही कठीण जाईल. अनेक फिनटेक स्टार्टअप संस्था त्यांची जागा घेण्याचा धोका आहे.
इंटरनेट व्यवहार होणार झपाट्याने-
अमिताभ कांत असेही म्हणाले की, मोबाइल फोन आणि इंटरनेट आधारित वित्तीय व्यवहारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांना विश्लेषण आणि कर्जपुरवठ्याची पद्धत व प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. चांगला कर्ज इतिहास असलेल्या गरजू लोकांना या संस्था सहजपणे कर्ज देतील, अशी स्थिती आहे.
भारत ‘डाटाश्रीमंत’ होईल-
भारत आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्याआधीच डाटादृष्ट्या श्रीमंत होणार आहे. त्यामुळे आॅनलाइन वित्तसेवांचा प्रसार झपाट्याने होणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने तंत्रज्ञान वापर, डाटा विश्लेषण आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून वित्तीय सेवा देण्याची क्षमता या बाबी महत्त्वाच्या असतील.