देशात सक्रिय रुग्ण फक्त २ लाख ८१ हजार, ९७ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:00 AM2020-12-26T06:00:41+5:302020-12-26T06:50:02+5:30
CoronaVirus News : शुक्रवारी देशात २३,०६८ नवे रुग्ण आढळून आले, तर २४,६६१ जण बरे झाले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. याच दिवशी कोरोनामुळे आणखी ३३६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४७,०९२ झाली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता अवघी २ लाख ८१ हजार इतकी उरली आहे. ९७ लाख १७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचे प्रमाण ९५.७७ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४५ टक्के आहे.
शुक्रवारी देशात २३,०६८ नवे रुग्ण आढळून आले, तर २४,६६१ जण बरे झाले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. याच दिवशी कोरोनामुळे आणखी ३३६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४७,०९२ झाली आहे. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १,०१,४६,८४५ झाला असून ९७,१७,८३४ जण बरे झाले आहेत. सलग चौथ्या दिवशीही कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी होती. सध्या देशात २,८१,९१९ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.७८ टक्के आहे.
जगभरात कोरोनाचे ७ कोटी ९८ लाख रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ६२ लाख जण बरे झाले, तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत १ कोटी ९१ लाख कोरोना रुग्ण आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये २० लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण
२० लाखांपेक्षा जास्त रुग्ण असलेले कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे, तसेच ब्रिटनमधील प्रवाशांनी अमेरिकेत येण्याआधी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे बंधन अमेरिकेने घातले आहे.