सांगा टिकणार कशी? १३५ कोटींच्या देशात २५ हजार लोकही बोलत नाहीत 'ही' लोकप्रिय भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:25 PM2022-09-28T13:25:26+5:302022-09-28T13:27:26+5:30
संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. देशातील अनेक भागांमध्ये आजही संस्कृत भाषेचे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धडे दिले जातात.
आग्रा-
संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. देशातील अनेक भागांमध्ये आजही संस्कृत भाषेचे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धडे दिले जातात. तर बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील लोकसंख्येतील मोठा हिस्सा आजही ऊर्दू भाषा बोलतो आणि दैनंदिन जीवनात या भाषेचा वापरही करतो. पण माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आकडेवारी पाहता देशात सध्या केवळ २४,८२१ लोकच संस्कृत भाषेत बोलतात. ही धक्कादायक आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागानं दिली आहे.
आग्रा येथील सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाशीष भट्टाचार्य यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना महत्वाची माहिती समोर आली आहे. डॉ. भट्टाचार्य यांना माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०११ सालच्या जनगणनेची माहितीच्या आधारे पाहिलं गेलं तर एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.००२ टक्के लोकच संस्कृत भाषा बोलतात असं आढळून आलं आहे.
डॉ. भट्टाचार्य यांच्या माहितीनुसार, संस्कृतला संविधानात अल्पसंख्याक भाषेच्या रुपात सूचीबद्ध करण्यात आलेलं नाही. उलट देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक संस्कृत भाषा आहे. २०१० साली उत्तराखंडनं आपल्या दुसरी अधिकृत भाषा म्हणून संस्कृत भाषेला स्थान दिलं. पण क्वचितच या भाषेत नागरिक संवाद साधत असतील. पण हिंदी भाषा जी संस्कृतसह इतर अनेक भाषांचं मिश्रण आहे ती कोट्यवधी लोक बोलतात.