ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यासाठी फक्त ३५ मिनिटं सूट
By मोरेश्वर येरम | Published: December 2, 2020 06:28 PM2020-12-02T18:28:27+5:302020-12-02T18:30:53+5:30
रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत.
नवी दिल्ली
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) संपूर्ण देशभरात हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पण ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्याची परवानगी देखील दिली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे यातही ३१ डिसेंबरच्या रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत.
दिल्ली, एनसीआर यासारख्या देशातील हवेची गुणवत्ता खराब असलेल्या शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी असल्याचं एनजीटीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी सांगितलं. हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ११.५५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंतच्या कालावधीत पर्यावरणपुरक फटाके फोडण्यास मूभा देण्यात आल्याचंही ते पुढे म्हणाले. बंदी घालण्यात आलेल्या फटाक्यांची खरेदी आणि विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यंदा प्रदुषणासह कोविड संकटामुळे दिवाळीत देशात अनेक शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. यात ९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत दिल्ली आणि एनसीआरमध्ये फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घातले होते. त्यानंतर दिल्ली सरकारनेही फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही महापालिकेने तातडीने निर्णय घेत दिवाळीत फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली होती. महापालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास किंवा आतिषबाजी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मध्यम स्वरुपाचे फटाके फोडण्यास सवलत देण्यात आली होती.