"माझ्यासाठी देशात फक्त ४ जाती; त्यांच्या विकासासाठी..."; पंतप्रधानांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:50 PM2023-11-30T13:50:46+5:302023-11-30T14:40:57+5:30
मूळ जाती-धर्माच्या पलिकडे विचार करुन या ४ जातींच्या प्रगतीनेच देशाचा विकास होईल, असेही मोदींनी म्हटले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केले. यावेळी, बोलताना मोदींनी जातीय समीकरणावर भाष्य केलं. मात्र, आपण देशात केवळ चार जाती मानत असल्याचं मोदींनी म्हटलं. मोदींनी कुठल्याही जातीचा उल्लेख न करता, केवळ गरीब, युवा, महिला आणि शेतकरी याच चार जाती देशात असल्याचं मोदींनी म्हटलं. या चारही जातींच्या बळकटीसाठी, विकासासाठी आपण काम करत आहोत. आस्था आणि मूळ जाती-धर्माच्या पलिकडे विचार करुन या ४ जातींच्या प्रगतीनेच देशाचा विकास होईल, असेही मोदींनी म्हटले.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला असून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचं आश्वासन काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी दिलं. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्यात आली आहे. तसेच, तेथील नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनाही केली आहे. त्यामुळे, देशात निवडणुकांच्या तोंडावर जातीय समीकरण जोडली जात आहेत. जातीय व आरक्षणाच्या लाभाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातींबद्दल मोठं विधान केलं आहे.
Viksit Bharat Sankalp Yatra aims to achieve saturation of government schemes and ensure benefits reach citizens across the country.
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2023
https://t.co/fqgyl5uXJJ
माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे गरीब, युवा, महिला आणि माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे ती शेतकरी, असे म्हणत मोदींनी मानवतेच्या नजरेतून जातीची वर्गवारी केली आहे. तसेच, या चार जातींच्या उद्धार झाल्यास देश विकसित होईल, असे मोदींनी म्हटले. ही जी संकल्प यात्रा घेऊन मी जात आहे, त्याचा उद्देश एकमेव आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया मला ऐकून घ्यायच्या आहेत. त्यांचा अनुभव मला ऐकायचा आहे. तसेच, ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना पुढील ५ वर्षात शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे, असे मोदींनी म्हटले.
देशाच्या प्रत्येक गावात मोदींच्या विकासाची गॅरंटी देणारी गाडी पोहोचणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण झाले आहेत, असेही मोदींनी सांगितले, आम्ही या गाडीचं नाव विकासरथ असं ठेवलं होतं. पण, गेल्या १५ दिवसांत लोकांनीच या गाडीचं नामांतर केलं असून मोदी की गॅरंटीवाली गाडी असं नवं नाव ठेवण्यात आलं आहे. मला हे पाहून अधिक आनंद झाला की तुमचा माझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच, मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्हाला दिलेल्या सर्वच गॅरंटी पूर्ण करणार आहे, असे मोदींनी म्हटले.