भाजपाकडून २८ पैकी केवळ ४ जणांना तिकीट; ४ मंत्र्यांना डच्चू, लोकसभेत उतरविणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:42 AM2024-02-15T09:42:48+5:302024-02-15T09:43:30+5:30
सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ५६ जागांसाठी २८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपने आज चार राज्यांमधील आणखी १२ उमेदवारांची नावे जाहीर करताना आणखी चार केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारले. यापूर्वी भाजपने राज्यसभेच्या १६ जागांची नावे जाहीर केली होती. झारखंडमधील एका जागेसाठीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.
सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ५६ जागांसाठी २८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. निवृत्त होणाऱ्या २८ पैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपने महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नाही. भाजप नेतृत्वाने आपल्या अनेक मंत्र्यांना तिकीट नाकारले; शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव (राजस्थान) आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (महाराष्ट्र) यांना तिकीट नाकारले आहे.
भाजपने काय दिले संकेत?
भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांसारख्या सात केंद्रीय मंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेते आणि निवृत्त राज्यसभा सदस्यांना पुन्हा तिकीट दिलेले नाही. पक्षाचे हे पाऊल आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी अनेकांना रिंगणात उतरविण्याचे संकेत मानले जात आहेत.
राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम?
जावडेकर आणि राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला की नाही, हे एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच ठरेल. भाजपश्रेष्ठींनी ठरविल्यास प्रकाश जावडेकर पुणे लोकसभा मतदारसंघातून, नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून, तर डॉ. विनय सहस्रबुद्धे ठाणे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढू शकतात.
विनाेद तावडे मुंबईतून?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची राज्यसभा सदस्यत्वासाठी चर्चा होती. आता त्यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळेल काय याची चर्चा आहे. पीयूष गोयल यांनाही उत्तर किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई, तर शरद पवार गटाकडून पवार यांच्या विश्वासू वंदना चव्हाण यांनाही लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळू शकते.
जे. पी. नड्डा गुजरातमधून
राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे ओडिशातून राज्यसभेचे तिकीट राखण्याबाबत भाग्यवान ठरले. माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनीही त्यांची मध्य प्रदेशातील जागा राखली आहे. जे. पी. नड्डा यांना हिमाचलऐवजी गुजरातमधून स्थान देण्यात आले आहे.