भारतीय यंत्रणांना फक्त ६ अतिरेक्यांना रोखता आले नाही - जैश-ए-मोहम्मदने उडवली खिल्ली
By admin | Published: January 9, 2016 09:33 AM2016-01-09T09:33:44+5:302016-01-09T12:32:27+5:30
भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही अशा शब्दात जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याने खिल्ली उडवली,
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / पठाणकोट, दि. ९ - 'भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही' अशा शब्दात कुख्यात दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने खिल्ली उडवली आहे. या संघटनेतर्फे www.alqalamionline.com या वेबसाईटवर एक ऑडिओ क्लिप अपलोड करण्यात आली असून त्यात पठाणकोट हल्ल्याशी संबंधित गोष्टींबाबत खुलासा करत असून हा हल्ला कसा घडवण्यात आला तेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अझहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणा-या एका उर्दू वृत्तपत्रातही १३ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपबाबत मजकूर छापण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात २ जानेवारी रोजी लष्कराच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसून हल्ला केला. तीन दिवसांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले, मात्र त्यात सात जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले.
या ऑडिओ क्लिपमध्ये सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवण्यात आली आहे तसेच दहशतवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या व हेलिकॉप्टर्सवर कसा हल्ला चढवला हेही नमूद करण्यात आले आहे.
'पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात?' असा सवाल विचारत मौलाना मसूद अझहरने पाकिस्तानला भारताने दिलेले पुरावे न स्वीकारण्याची धमकी दिली आहे. आमच्या सहा दहशतवाद्यांशीही भारतीय सैन्यातील जवान लढू शकले नाहीत, अशी खिल्ली त्यात उडवण्यात आली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि शूटर फतेह सिंग क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ' ते (जवान) अतिशय वाईट पद्धतीने मारले गेले. भारताने पहिल्यांदा सहा दहशतवादी असल्याचे सांगितले, मग तो आकडा पाच वर गेला आणि नंतर चार दहशतवादी झाले...! एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे. तेथील (भारत) सरकार भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहेत' अशी संतापजनक भाषा ऑडिओत वापरण्यात आली आहे.