पाकच्या सीमेवरील २,0६१ पैकी फक्त ६१६ दिवे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:05 AM2018-12-26T06:05:14+5:302018-12-26T06:05:25+5:30
गुजरातमधील भुज, कच्छ भागात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घातले असून, तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २,०६१ वीजदिवे बसविण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : गुजरातमधील भुज, कच्छ भागात पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घातले असून, तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २,०६१ वीजदिवे बसविण्यात आले आहेत. त्यातील फक्त ६१६ दिवेच सुरू असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ही माहिती दिली आहे. सीमेवर ८२ जनरेटर असून, त्यातील फक्त ३८ व्यवस्थित सुरू आहेत. साधनांची नादुरुस्ती व कमतरतेमुळे सीमेवर टेहळणी करण्याच्या कामात खूप अडथळे येत आहेत. या बैठकीला बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा उपस्थित होते. त्यांनी या खात्याच्या अधिकाºयांबरोबर अन्य प्रकल्पांसंदर्भातही चर्चा केली.
भारताच्या चार राज्यांलगत पाकिस्तानची सीमा आहे. तिची लांबी जम्मू- काश्मीरमध्ये (१,२२५ कि.मी.), राजस्थान (१,०३७ कि.मी.), पंजाब (५५३ कि.मी.), गुजरात (५०८ कि.मी.) इतकी आहे. सीमेचे कुंपण तोडून पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार बहुतकरून रात्री किंवा पहाटे घडतात. त्यामुळे सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता तेथे टेहळणीसाठी असलेले सर्व दिवे सुरू असणे हे अत्यंत आवश्यक आहे. या वीजदिव्यांची देखभाल केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाते. भुज, गांधीनगर येथील जनरेटरची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होईल, असे या खात्यातर्फे बीएसएफला सांगितले.
काश्मीरमध्येही काम अर्धवट]
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवरील २८ कमांड पोस्टपैकी फक्त तीनच आजवर बांधून पूूर्ण झाल्या आहेत. तसेच १७ पोस्टचे बांधकाम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. उरलेल्या आठ पोस्टचे काम अद्याप सुरूच करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या भागात नदीकिनारी भागात ४३ हायमास्ट दिवे बसविण्यात येणार होते.
त्यातील फक्त २५ दिवे बसविण्यात आले असून, बाकी तीन दिव्यांचे काम कासवगतीने सुरू आहे. उर्वरित १५ हायमास्ट दिवे बसविण्याचे काम कधी सुरू करणार, याबद्दल काहीही हालचाल नाही.