शिक्षणाच्या आयचा घो... ‘ग्रामीण’चे फक्त ८% विद्यार्थी ऑनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:36 AM2021-09-08T06:36:33+5:302021-09-08T06:37:08+5:30
पाहणीतील निष्कर्ष : ३७ टक्के तर अजिबात शिकत नव्हते
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना महामारी धडकल्यानंतर बंद कराव्या लागलेल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी गंभीर परिणाम करणाऱ्या ठरल्या. विशेषत: ग्रामीण भागांत फक्त ८ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिकत होते तर ३७ टक्के अजिबात नव्हते, असे नव्या पाहणीतून समोर आले आहे. खासगी शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे होती त्यातील २५ टक्के गेले १७ महिने सुरू असलेल्या शाळा बंदच्या काळात सरकारी शाळांकडे वळले.
अर्थतज्ज्ञ जिन ड्रेझ, रितिका खेरा आणि संशोधक विपूल पैकरा यांच्या देखरेखीखालील झालेल्या या पाहणीत १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पहिली ते आठवीच्या १४०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या या पाहणीत आसाम, बिहार, महाराष्ट्र, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश होता. पाहणीचा निष्कर्ष हा खेड्यांत आणि शहरी भागांतील वस्त्यांत १४०० कुटुंबांत घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आहे.