निमंत्रण असेल तरच पक्षाच्या सभांना हजेरी -शत्रुघ्न सिन्हा
By admin | Published: October 18, 2015 10:22 PM2015-10-18T22:22:59+5:302015-10-18T22:22:59+5:30
अलीकडे वारंवार केलेल्या विधानांमुळे वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी नाराज असल्याचा इन्कार करतानाच पक्षाकडून निमंत्रण मिळेल
कोच्ची : अलीकडे वारंवार केलेल्या विधानांमुळे वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी नाराज असल्याचा इन्कार करतानाच पक्षाकडून निमंत्रण मिळेल त्याच सभांना हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले.
बिहारमध्ये प्रचार करीत नसल्याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा भाजपसोबत आहेत. मी कोणत्याही वादाला जन्म देण्याला किंवा अप्रिय स्थिती बनण्याला कारणीभूत न ठरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी माझ्याकडून वादात पडणे सोडले आहे. मला निमंत्रण असेल अशाच कार्यक्रमांना मी हजेरी लावेन. मी प्रचार कार्यापासून दूर राहत संसदीय कर्तव्य बजावण्याकडे लक्ष देत आहे. मी येथे आलो आहे. माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नाही. आम्ही योग्य दिशेने वाटचाल केल्यास अपेक्षेनुसार चांगले प्रदर्शन होत राहील. मी हे स्थानिक नेत्यांबद्दल बोलत आहे. काही लोक महत्त्वाकांक्षी आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. निवडणुकीत कोणाचा विजय होणार? यावर हा निर्णय जनतेचाच राहील, असे ते म्हणाले.