पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 16:33 IST2017-12-22T16:14:39+5:302017-12-22T16:33:47+5:30
पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे

पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद केलं तरच चर्चा होणार - लष्करप्रमुख बिपीन रावत
जयपूर - पाकिस्तान जेव्हा जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करेल, तेव्हाच शांततेची चर्चा सुरु होईल अशा थेट इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. पाकिस्तानचं वागणं पाहता त्यांना खरंच शांतता नांदावी असं वाटत असेल असं मला तरी वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमारेषेवर आयोजित 'हमेशा विजयी' कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणं बंद केलं पाहिजे असं बिपीन रावत म्हणाले आहेत. 'त्यानंतरच आपण शांतता चर्चा सुरु होऊ शकते', असं बिपीन रावत यांनी ठणकावून सांगितलं. 'आम्हालाही दोन्ही देशामधील संबंध सुधारावेत असं वाटत आहे. पण सीमारेषेलीकडे सुरु असलेल्या कुरापती आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादाला मिळणारं समर्थन पाहता त्यांना खरंच शांतता हवी आहे असं वाटत नाही', असं बिपीन रावत यांनी सांगितलं.
'जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दल जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात यशस्वीपणे कारवाई करत असून, ही कारवाई सुरु राहणार आहे', असं त्यांनी सांगितलं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांचं वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी इस्लामाबादने दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली तर भारत संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेईल असं म्हटलं होतं.
'पाकिस्तानने आमची दहशतवादविरोधी भूमिका समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यांच्या भूमीवरुन सक्रीय असणा-या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यासाठई आम्ही सांगितलं आहे. मैत्रीपुर्ण संबंध व्हावेत असं खरंच वाटत असेल तर पाकिस्तानने यावर विचार केला पाहिजे', असं रवीश कुमार म्हणाले होते.