केवळ ४९00 कोटींचे काळे धन घोषित; २१ हजार लोकांनी जाहीर केली जुन्या नोटांतील ‘रोख’ जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:07 AM2017-09-09T01:07:04+5:302017-09-09T01:07:09+5:30
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली (पीएमजीकेवाय) २१ हजार लोकांनी ४,९०० कोटी रुपयांचा काळा पैसा घोषित केला आहे, असा दावा प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली (पीएमजीकेवाय) २१ हजार लोकांनी ४,९०० कोटी रुपयांचा काळा पैसा घोषित केला आहे, असा दावा प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने केला. नोटाबंदीनंतर सरकारने काळा पैसा घोषित करून त्यावर कर आणि दंड चुकता करून लोकांसाठी एक योजना घोषित केली होती. ही योजना ३१ मार्च रोजी बंद झाली होती. त्यानुसार करापोटी २,४५१ कोटी रुपयांची वसुलीही झाली, असे हा अधिकारी म्हणाला.
घोषित काळ्या पैशांचा हा अंतिम आकडा आहे. काही प्रकरणात कायदेशीर कारवाईबाबत प्राप्तिकर विभाग पाठपुरावा करीत आहे, असे सांगण्यात येत आहे. अर्थात ४९00 कोटी रुपये ही खूपच कमी रक्कम आहे. याहून अधिक रक्कम या योजनेखाली जाहीर होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. म्हणजेच या योजनेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही, असे दिसते.
महसूल सचिव हसमुख अढिया यांनीही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेखाली घोषित झालेल्या काळ्या पैशांच्या आकड्यावरून या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगितले होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेपूर्वी अशाच प्रकारची एक योजना होती. त्यामुळे या योजनेला जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादाकडे वेगळ्या अर्थाने पाहू नये, असे म्हटले आहे.
याआधी आयडीएस योजना होती. पीएमजीकेवाय या क्रमातील शेवटची योजना होय. त्यातहत घोषित काळ्या पैशांवर त्यावर कर आणि दंड चुकता करून संभाव्य कारवाईपासून सुटका करण्याची संधी देण्यात आली होती.
काय होती योजना?
या योजनेत ४९.९% कर, अधिभार आणि दंड देणे भाग होते. तसेच घोषित उत्पन्नापैकी २५% रक्कम बिनव्याजी खात्यात चार वर्षे ठेवायची आहे.