धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात!
By admin | Published: July 4, 2017 01:07 AM2017-07-04T01:07:45+5:302017-07-04T01:07:45+5:30
धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात. त्यामुळे बदलाला विरोध करण्याच्या मानसिकतेने काम करू नका. अशा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : धाडस दाखविले तरच प्रस्थापित व्यवस्थेत बदल घडविता येतात. त्यामुळे बदलाला विरोध करण्याच्या मानसिकतेने काम करू नका. अशा मानसिकतेमुळेच भारताला क्षमता असूनही हवी तेवढी प्रगती करता आली नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
२०१५च्या आयएएस तुकडीच्या अधिकाऱ्यांपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी भाषण झाले. मोदी म्हणाले की, ज्या देशांनी भारतानंतर स्वातंत्र्य मिळविले आहे, ज्यांच्याकडे साधनांची कमतरता होती त्यांनी विकासाच्या बाबतीत नवी उंची गाठली आहे. तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते म्हणाले की, बदलांना विरोध करणाऱ्या मानसिकतेपासून दूर राहण्याची गरज आहे. भारताची प्रशासकीय व्यवस्था नव्या उर्जेने भरुन टाकायला हवी. व्यवस्थेतील परिवर्तनासाठी गतिशील बदलांची आवश्यकता आहे.
मोदी म्हणाले की, सहायक सचिव म्हणून आगामी तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधावा. कारण, येथील व्यवस्थेला त्यांची उर्जा आणि नवे विचार तसेच सचिव स्तरांच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकारांचा फायदा होईल. यूपीएससीच्या निकालापर्यंतचे आपले आयुष्य, त्यांनी स्वीकारलेली आव्हाने व आतापर्यंतच्या संधी यावर त्यांनी विचार करावा. जेणेकरुन व्यवस्था आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकेल. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.