सोशल डिस्टन्सिंग पाळणाऱ्या भक्तांनाच मंदिर प्रवेश; विविध उपक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 02:00 AM2020-07-21T02:00:11+5:302020-07-21T06:24:57+5:30
मंगळागौर साजरी न करण्याचा महिलांचा निर्णय
- अनिरुद्ध पाटील।
बोर्डी : श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून या काळात भक्त मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समित्यांकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच शासनाच्या नियमांच्या अधीन राहून मंदिर प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे, तर बोडीर्तील महिलांनी मंगळागौर साजरी न करण्याचे ठरविले आहे.
डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिव मंदिरे असून श्रावण महिन्यात येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता तालुक्यातील विविध मंदिर समितीकडून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच दर्शनाचा लाभ देण्याचे ठरवले आहे. डहाणू फोर्ट येथे चारशे वर्ष जुने पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात या स्वयंभू मंदिरात भक्तांची गर्दी होते.
बर्फाचे शिवलिंग साकारण्यासह, मातीचे हजार शिवलिंग असे विविध उपक्रम राबवले जातात. या मंदिरात साधारणत: शंभर भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील एवढी जागा आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच मंदिर प्रवेश दिला जाईल, अशी माहिती शंभू महाराज यांनी दिली. तर पारनाका येथील श्री विश्वेश्वर महाराज मंदिरात कोरोना काळात पालन करावयाचे नियम सूचना फलक व भित्तिपत्रकाद्वारे लिहिले असून भक्तांनी त्याचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. तर श्री महिला सेवा मंडळातर्फे श्रावण महिन्यातील भजन-कीर्तनाचे केले जाणारे आयोजन या वेळी रद्द केल्याची माहिती या मंडळाच्या सेक्रेटरी राधिका पोंदा यांनी दिली.
दरम्यान, बोर्डीतील स्फूर्ती महिला क्लबतर्फे दरवर्षी सुमारे सव्वाशे महिलांकडून मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केला जात होता, मात्र कोरोनाचा कहर पाहता यंदा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती संचालिका उर्मिला करमरकर यांनी दिली.