शशिकला कुटुंबाला पक्षातून काढा, तरच चर्चा होऊ शकते
By admin | Published: April 19, 2017 02:01 AM2017-04-19T02:01:33+5:302017-04-19T02:01:33+5:30
पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की
तेनी : पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की, शशिकला कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षातून काढून टाकले तरच आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. शशिकला आणि त्यांचे भाचे तसेच अन्य नातेवाईक यांना पक्षात स्थान असता कामा नये, अशी पनीरसेल्वम गटाची मागणी आहे.
मुख्यमंत्री ई. पलानीसामी गटाला ही मागणी मान्य असल्याचे दिसते. आपले मुख्यमंत्रीपद कायम राहावे, असे पलानीसामी यांचे म्हणणे आहे. पनीरसेल्वम यांना हे म्हणणे मान्य असून, सरचिटणीसपदी आपली निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरही पनीरसेल्वम गट ठाम आहे. काही मंत्र्यांनी सोमवारी चेन्नईत बैठक घेऊन दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणावर चर्चा केली होती. पनीरसेल्वम यांनी दावा केला आहे की, जयललिता यांच्या मृत्यूनंतर कायद्याचे उल्लंघन करत शशिकला यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. पनीरसेल्वम यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असून, त्यात पक्षाच्या घटनेनुसार निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शशिकला यांच्या निवडीला त्यांनी यापूर्वीही आव्हान दिलेआहे.
पनीरसेल्वम म्हणाले की, पक्षाचे संस्थापक एमजीआर आणि अम्मा यांनी या पक्षाला कार्यकर्ता आधारित व लोकशाही संघटनेच्या स्वरुपात उभे केले आहे. त्यांच्या मार्गावरुन जर आम्ही चाललो नाही तर, जनतेप्रति तो अन्याय होईल. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जयललिता यांनी यापूर्वीच पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर शशिकला यांनी माफीनामा सादर करुन कोणतेही पद घेणार नाही म्हणून सांगितले होते. (वृत्तसंस्था)