देशात काय एकटे शेतकरीच आत्महत्या करतात का? भाजपाच्या मंत्र्याचा उर्मट सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:59 AM2018-04-29T11:59:28+5:302018-04-29T11:59:28+5:30
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता.
भोपाळ: कर्जमाफी आणि शेतकरी समस्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारची सातत्याने कोंडी होत असतानाच भाजपच्याच एका मंत्र्याच्या वक्तव्यामुळे हा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील भाजपाचे आमदार व मंत्री बाळकृष्ण पाटीदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी आत्महत्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, देशात आत्महत्या कोण करत नाही? व्यापारी आत्महत्या करतात, पोलीस आयुक्तही आत्महत्या करतात. त्यामुळे ही संपूर्ण देशातील समस्या आहे. फक्त आत्महत्या करणाऱ्यालाच त्याच्यामागील खरे कारण माहिती असते. आपण लोक केवळ त्याचा अंदाज लावत असोत, असे बाळकृष्ण पाटीदार यांनी म्हटले. पाटीदार यांच्या या विधानामुळे शिवराजसिंह चौहान यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच मंदसौर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारामुळे देशभरातील जनमत प्रक्षुब्ध झाले होते. त्यानंतर भाजपच्या मंत्र्याकडून अशाप्रकारचे बेताल वक्तव्य करण्यात आल्याने पक्षाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींचा हा सल्ला भाजपच्या नेत्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाही.
Suicide kaun nahi karta? Vyapaari karta hai, Police commissioner bhi karta hai. Yeh poore world ki problem hai. Suicide ka kaaran jo suicide kar rha hai sirf usse pata hai. Hum log sirf andaaza lagaate hain: Balkrishna Patidar, Madhya Pradesh minister on farmers' suicides. pic.twitter.com/9qD7foXY1B
— ANI (@ANI) April 29, 2018