एअर इंडिया टिकली तरच नोकरी टिकेल
By admin | Published: December 26, 2016 12:53 AM2016-12-26T00:53:51+5:302016-12-26T00:53:51+5:30
एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील
नवी दिल्ली : एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील, अशा शब्दांत नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी संकेत दिले.
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षात एअर इंडिया फायद्यात होती व काम चांगले झाले, असे सांगताना त्यांनी अधिक समन्वयाने काम होणे गरजेचे आहे यावर भर दिला. सध्या केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर असलेली एअर इंडिया आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात खर्च कमी करणे, उपलब्ध साधनांचा व क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करणे, नवी उड्डाणे सुरू करण्याचा समावेश आहे.
एअर इंडियावर सगळीकडून टीका होत असताना राजू हे एअर इंडियाची पाठराखण करतात. ते म्हणाले एअर इंडियाने चांगले काम केले असले तरी आणखी चांगले केले जाऊ शकते. एअर इंडियात समन्वयाची गरज आहे, असे ते एका मुलाखतीत म्हणाले.
राजू म्हणाले, स्पर्धक कंपन्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा यात काही अंतर आहे. ही संतुष्टता एअर इंडियातील नोकरीची काळजी नसण्याच्या भावनेतून निर्माण झाली आहे का असे विचारता गजपती राजू म्हणाले की नोकरीची हमी आहे पण जो पर्यंत एअर इंडिया टिकून आहे तोपर्यंतच. जेथे संस्था टिकून राहतात तेथेच नोकरीही टिकून राहते. जेव्हा संस्थाच राहात नाही तेव्हा तुमच्या नोकरीचे काय होणार असा प्रश्न त्यांनी विचारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)