मोदींनाच माहिती! राजस्थानात सीएम पदावर मोठा सस्पेंस, आमदार जमू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:31 PM2023-12-12T13:31:10+5:302023-12-12T13:31:40+5:30
वसुंधराराजेंच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. राजनाथ यांच्यासोबत विनोद तावडेही असणार आहेत. या दोघांना रिसिव्ह करण्यासाठी वसुंधरा राजे विमानतळावर जाण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून भाजपाने मोठा सस्पेंस ठेवला आहे. ज्या ज्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत ते नेते हात वर करत आहेत. अशातच पर्यवेक्षक राजनाथ सिंह लोकसभेतून जयपूरला रवाना झाले असून भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांना बोलविण्यात आले आहे. यातच या आमदारांना विचारले असता नाव मोदींनाच माहिती, असे हे आमदार माध्यमांना सांगत आहेत.
दुसरीकडे वसुंधराराजेंच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. राजनाथ यांच्यासोबत विनोद तावडेही असणार आहेत. या दोघांना रिसिव्ह करण्यासाठी वसुंधरा राजे विमानतळावर जाण्याची शक्यता आहे. हॉटेल ललितमध्ये त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या कार्यालयात खुर्च्या सजविण्यात येत आहेत. मंच देखील तयार करण्यात आला आहे. भाजपाचे प्रभारी अरुण सिंह यांनी याची पाहणी केली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या नावाबाबत अद्याप पत्ते उघडले गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आणखी दोन नावांची चर्चा आहे. सुनील बन्सल आणि गजेंद्र सिंह शेखावत यांची नावे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आली आहेत.
पडताळणीनंतर आमदारांना भाजप कार्यालयात प्रवेश मिळत आहे. यादी जुळल्यानंतर त्यांना सुरक्षा गराड्यात प्रवेश दिला जात आहे. या बैठकीला महेंद्र दिलावर यांच्यासह २० हून अधिक आमदार उपस्थित होते. दुपारी दीड वाजता आमदारांची नोंदणी सुरू होईल. दुपारी 3:45 वाजता निरीक्षक पोहोचणार आहेत. भाजप कार्यालयात 4 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.