फक्त युनिफॉर्ममध्येच तिकीट चेक करणार टीसी, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:53 PM2017-09-28T17:53:45+5:302017-09-28T18:04:28+5:30
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी यापुढे टीसींना केवळ युनिफॉर्ममध्येच तिकीट चेकिंग करावं लागणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी यापुढे टीसींना केवळ युनिफॉर्ममध्येच तिकीट चेकिंग करावं लागणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राजधानी दिल्लीत आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलताना अधिकृत गणवेशातच सर्व आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकर यांनी चेकिंग करावे, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. त्यामुळे विनातिकीट रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी टीसींना साध्या वेशात येण्याची शक्कल आता करता येणार नाही. यापुढे फक्त युनिफॉर्ममध्येच तिकीट चेक करण्याची मुभा टीसींना असेल असं ट्विट देखील रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होणार असून अनेक ट्रेन्सच्या प्रवासाच्या वेळेत घट होणार आहे. प्रत्येक फूड पॅकेटवर एमआरपी छापणे आवश्यक असल्यामुळे कोणाकडूनही अतिरिक्त किंमत आकारता येणार नाही, असेही गोयल यांनी सांगितले आहे.
पाच हजारांपेक्षा जास्त मानवविरहित रेल्वे फाटके वर्षभराच्या आत बंद केली जाणार आहेत. जास्त पैसे खर्च करावे लागले तरी सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
गँगमनचे अपघात रोखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक किट तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
लोकल प्रवाशांसाठी १०० नव्या फे-या! रेल्वेमंत्री करणार घोषणा, प्रवाशांसाठी ‘अच्छे दिन’-
उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी ऑक्टोबरपासून लोकल प्रवास सुलभ होण्याची चिन्हे आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फे-या वाढणार आहेत. तर मध्य मार्गावर १६ फे-यांची वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे शुक्रवार, २९ सप्टेंबरला मुंबई दौºयावर येणार आहेत. या वेळी ते १०० लोकल फेºयांची घोषणा करणार आहेत. ऑक्टोबरपासून हार्बरवर नवीन फेºया सुरूहोणार आहेत. मात्र मध्य मार्गावरील प्रवाशांना वाढीव फेºयांसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई उपनगरीय सेवेत सध्या २,९८३ लोकल फे-या सुरू आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर १,६६० लोकल फे-या होतात. उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. परिणामी, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी फेºया वाढवण्याची चर्चा बरेच दिवस रेल्वे वर्तुळात रंगत होती. लोकल फेºया वाढवण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर वेळप्रसंगी रेल रोकोही करण्यात आला होता. त्यामुळेच अखेर वाढीव लोकल फेºया सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
नवनियुक्त रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबई दौºयावर आल्यानंतर १०० लोकल फेºयांची घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यापैकी ६८ लोकल फेºया (यातील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर प्रत्येकी १४ फेºया) या मध्य मार्गावर आणि ३२ लोकल फेºया या पश्चिम रेल्वेमार्गावर होतील. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील प्रत्येकी १४ फेºया १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मध्य मार्गावरील वाढीव १६ फेºया १ नोव्हेंबरपासून सुरू होतील. उर्वरित लोकल फेºया जानेवारी २०१८मध्ये सुरू होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे.
रेल्वेमंत्री येती ‘सीएसएमटी’दारा...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल २९ तारखेला मुंबई दौ-यावर येणार आहेत. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. प्रत्येक अधिकाºयाच्या ‘ड्युटी’वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीला पायºयांवर रेड कार्पेट अंथरण्याच्या कामासदेखील वेग आला आहे. परिणामी, दसरा सणाच्या आधीच मध्य रेल्वेवर रेल्वेमंत्र्यांच्या आगमनामुळे सणासुदीसारखी तयारी करण्यात येत आहे.
१०० लोकल फे-यांपैकी मध्य मार्गावरील २४ लोकल फे-या या जानेवारी २०१८मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित ७६ लोकल फे-यांचा तपशील पुढीलप्रमाणे
मार्ग फे-या कधीपासून
मध्य १६ १ नोव्हेंबर
हार्बर १४ १ ऑक्टोबर
ट्रान्स हार्बर १४ १ ऑक्टोबर
पश्चिम ३२ १ ऑक्टोबर