एकमेव संस्कृत दैनिक संकटात!
By admin | Published: June 13, 2016 06:31 AM2016-06-13T06:31:06+5:302016-06-13T07:50:01+5:30
देशातील एकमेव संस्कृत दैनिक असल्याचा दावा करणाऱ्या ‘सुधर्मा’ या दैनिकाचा सध्या आर्थिक परिस्थितीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे
नवी दिल्ली : देशातील एकमेव संस्कृत दैनिक असल्याचा दावा करणाऱ्या ‘सुधर्मा’ या दैनिकाचा सध्या आर्थिक परिस्थितीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. हे दैनिक ४६ वर्षे पूर्ण करीत आहे, हे विशेष.
म्हैसूर येथून प्रकाशित होणाऱ्या या दैनिकाचे संपादक संपत कुमार यांनी केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली असली तरी अद्याप त्यांना याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. या दैनिकाच्या सध्या तीन हजार प्रती छापल्या जातात. याबाबत बोलताना संपादक संपत कुमार म्हणाले, की आम्हाला मदतीची गरज आहे. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांंना लेखी कळविले आहे; पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, नागरिकांनी दैनिकासाठी मदत करावी, असे आवाहन या दैनिकात प्रकाशित करण्यात आले आहे. या आवाहनात म्हटले की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आजच्या काळात दैनिकांचे अस्तित्व कायम राखणे आव्हानात्मक झाले आहे. आमचे वाचक आणि शुभचिंतक खप वाढविण्यासाठी सल्ले देत आहेत. या दैनिकाला नवे स्वरूप देणे आणि ‘सुधर्मा’ अर्धवार्षिक काढण्याचा विचार सुरू केला आहे. आम्ही एका रंगाची आॅफसेट मशिन खरेदी करणार आहोत. याची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे. हे स्वप्न साकार करण्यास आम्हाला आपल्या सहकार्याची गरज असल्याचे आवाहनही करण्यात आले.
> १९७० मध्ये सुरुवात...
नागरिकांना केलेल्या आवाहनात संपादकांनी असेही म्हटले आहे की, ‘सुधर्मा’ हे दैनिक म्हणजे आमच्यासाठी उत्पन्नाचे साधन नाही. पत्रकारिता आणि संस्कृत याच्या आवड, इच्छाशक्तीचे हे फळ आहे. दरम्यान, ‘सुधर्मा’ या दैनिकाची सुरुवात संस्कृत विद्वान कालेले नदादूर वरदराजा आयंगर यांनी १९७० मध्ये केली होती. संस्कृत भाषेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा उद्देश होता.