केवळ सुमित्रा महाजनच माझे कान उपटू शकतात - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 04:51 IST2019-05-14T04:50:29+5:302019-05-14T04:51:17+5:30
खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला.

केवळ सुमित्रा महाजनच माझे कान उपटू शकतात - नरेंद्र मोदी
इंदूर : खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. इंदूर येथे आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
सुमित्रा महाजन यांचा ‘ताई' असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, लोकसभाध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांनी व मी अनेक वर्षे भाजपमध्ये एकत्र काम केले आहे. इंदूरच्या विकासाबाबत ताईंची सर्व स्वप्ने आम्ही पूर्ण करू. सुमित्रा महाजन यावेळी व्यासपीठावर होत्या.
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी निवडणुकीस उभे राहू नये, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यानुसार मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यंदा रिंगणात नाहीत. इंदूरमधून आठवेळा निवडून आलेल्या सुमित्रा महाजन ७६ वर्षे वयाच्या असून त्यांना आता उमेदवारी देऊ नये, असा पक्षनेतृत्वाचा विचार होता. उमेदवारीबद्दल बरेच दिवस काही कळविण्यात न आल्याने पक्षनेतृत्व हा निर्णय आपल्याला सांगण्यास संकोचत असावे, हे सुमित्रा महाजन यांच्या लक्षात आले. अखेर त्यांना याबाबत पक्षाला पत्र लिहावे लागले होते. (वृत्तसंस्था)
नाराजीची चर्चा
आपणास निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्वत: सुमित्रा महाजन यांनी भाजपाध्यक्षांना कळविले होते. त्यामुळे उमेदवार उभा करण्यास तुम्ही मोकळे आहात, असेही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्या नाराज असल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. आता इंदूरमधून शंकर लालवानी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांना सुमित्रा महाजन यांनी पाठिंबा दिला आहे.