राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार, लवकरच भगवा फडकणार - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:30 PM2017-11-24T15:30:49+5:302017-11-24T18:45:03+5:30
राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं.
बंगळुरु - राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबरला अयोध्या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. त्याआधी मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन भागवत बोलले आहेत की, 'राम मंदिरावर लवकर भगवा झेंडा फडकताना दिसेल. राम जन्मभूमीवर दुसरं कोणतंच बांधकाम होऊ शकत नाही'. राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं आणि त्याच दगडाने त्याचं बांधकाम केलं जाईल असं मोहन भागवत यांनी सांगितलं. यावेळी मोहन भागवत यांनी गाईंची सुरक्षा केलीच पाहिजे यावर जोर दिला. 'जोपर्यंत गोहत्येवर बंदी येत नाही, तोपर्यंत आपण शांततेने जगू शकत नाही', असं मोहन भागवत म्हणाले आहेत.
Ram janm bhoomi par Ram mandir hi banega aur kuch nahi banega, unhi patharon se bangega, unhi ki agvai mein banega jo iska jhanda utha kar pichle 20-25 varshon se chal rahe hain: RSS Chief Mohan Bhagwat in Udupi, Karnataka pic.twitter.com/w1LjMgp00u
— ANI (@ANI) November 24, 2017
'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद'
अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर एकीकडे राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एक प्रस्ताव ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.
चेअरमन सय्यद वसीम रिजवी यांनी सांगितलं होतं की, 'वेगवेगळ्या पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर विचार करुन आम्ही एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मस्जिद बांधण्याबद्दल सांगण्यात आलं आहे. कारण हा एकमेव उपाय आहे ज्यामुळे देशात शांतता आणि बंधुभाव टिकून राहिल'. 31 ऑक्टोबरला सय्यद वसीम रिजवी यांनी बंगळुरुत श्री श्री रवीशंकर यांची भेट घेत वाद शांततापुर्ण मार्गाने सोडवण्यासंबंधी चर्चा केली होती.
श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सय्यद वसीम रिजवी बोलले होते की, 'संपुर्ण देश आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचा आदर करतो. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद मित्रत्वाने मिटला पाहिजे असं शिया समाजाचं म्हणणं आहे'. यासोबत रिजवी यांनी सांगितलं होतं की, 'या मुद्दयावर शिया पंथियांना आपलं मत मांडण्याचा पुर्ण हक्क आहे. कारण 1944 पासून शिया बाबरी मस्जिदमध्ये नमाजाला जात होते. शिया प्रशासनाकडून चालवण्यात येणारी ही मस्जिद सुन्नी पंथियांनी आपल्या नावाने रजिस्टर केली होती. मात्र नंतर बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं'.
दुसरीकडे शिया पर्सनल लॉ बोर्ड मात्र मस्जिद जागेवरुन हटवण्यात तयार नाहीत. बोर्डाचे संस्थापक मौलाना सय्यद अली हुसे रिजवी यांनी सांगितलं की, 'शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी नाटकं करत आहेत. रिजवी संपुर्ण शिया पंथाला बदनाम करत आहेत. कायदेशीर अटक टाळण्यासाठी ते आरएसएसची भाषा बोलत आहेत'. 'अयोध्येत राम मंदिर उभारण्यावर मुस्लिमांचा काहीच आक्षेप नाही. पण बाबरी मस्जिदच्या जागेवर कब्जा करत मंदिर उभारलेलं कोणत्याही मुस्लिमाला मान्य नाही', असंही ते बोलले आहेत.