... तरच बंगाली भाषिक मुस्लीम मूलनिवासी मानले जातील, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:13 AM2024-03-26T09:13:34+5:302024-03-26T09:14:18+5:30
बंगाली भाषिक मुस्लिम आसामी प्रथा पाळू शकत असतील तर त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गुवाहाटी : बंगाली भाषिक मुस्लिमांना बालविवाह व बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथा सोडून द्याव्या लागतील, तरच त्यांना ‘खिलोंजिया’ म्हणजे राज्यातील मूळ रहिवासी मानले जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी म्हटले आहे.
‘बंगाली भाषिक मुस्लिम मूळ रहिवासी आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे. आम्ही काय म्हणतोय की जर त्यांना ‘मूल निवासी’ व्हायचे असेल तर आम्हाला काही अडचण नाही. पण त्यासाठी त्यांनी बालविवाह व बहुपत्नीत्व सोडून द्यायला हवे व महिलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करायला हवे. आसामी लोकांची एक संस्कृती आहे. त्यात मुलींची तुलना देवतांशी केली जाते. दोन-तीन वेळा लग्न करणे ही आसामी संस्कृती नाही,’ असे सरमा म्हणाले.
मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही स्वदेशी असण्यात काही अडचण नाही, पण त्यांना दोन-तीन बायका असू शकत नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. सत्र (वैष्णव मठ) जमिनीवर अतिक्रमण करून एखादा स्वदेशी कसा होऊ शकतो? बंगाली भाषिक मुस्लिम आसामी प्रथा पाळू शकत असतील तर त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.