ॲडव्हान्स पैसे भरणाऱ्यांनाच दिल्लीत खाजगी रुग्णालयात बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:23 AM2021-05-08T05:23:56+5:302021-05-08T05:24:17+5:30
दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का?
विकास झाडे
नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांची आर्थिक लूट करण्याचा दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी चंग बांधला आहे. भयग्रस्त रुग्णांना लुटणाऱ्या या रुग्णालयांवर केजरीवाल सरकारचा जराही अंकुश नाही.
दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? या गोष्टी आधी तपासल्या जातात. रुग्णाला भरती केले की मग रुग्णालयाचे मीटर सुरू होते. रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईकही रुग्णालयातील बिलावर आक्षेप घेत नाहीत. अनेक रुग्णांकडे हेल्थ इन्शुरन्स असला तरी त्यांना खासगी रुग्णालयात आगाऊ लाखो रुपये भरावे लागतात. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी लाखो रुपये मागण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांसाठी कोणतेही बंधन नसल्याची व्यथा अॅड. अभय गुप्ता यांनी सांगितली. उत्तम सेवा आणि आमचा अंकुश असल्याचा केजरीवाल सरकार सातत्याने दावा करीत असले तरी रुग्णालयांकडून केवळ फसवणूक केली जात आहे. जो पैसे अधिक देईल त्यालाच बेड उपलब्ध होऊ शकतो अशी स्थिती आहे. दिल्ली कोरोना अॅपवर प्रत्येक दोन तासांनी खासगी रुग्णालयांनी बेडच्या उपलब्धतेची माहिती देणे अत्यावश्यक आहे. एकाही खासगी रुग्णालयात एकही बेड रिकामा असल्याचे या अॅपवर दिसून येत नाही.