कुंभमेळ्यासाठी हवेत 'संस्कारी' पोलीस; शाकाहारी, निर्व्यसनी कर्मचाऱ्यांना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 01:10 PM2018-09-28T13:10:13+5:302018-09-28T13:12:29+5:30
15 जानेवारीपासून सुरू होणार कुंभमेळा
अलाहाबाद: तरुण, तडफदार, निर्व्यसनी, मृदूभाषी, शाकाहारी व्यक्ती हवी. ही काही एखाद्या लग्नासाठी दिलेली जाहिरात नाही. तर कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या पोलिसांमध्ये हे गुण असायला हवेत. कारण उत्तर प्रदेश सरकारला कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी संस्कारी पोलीस हवे आहेत. 15 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी 'संस्कारी' पोलिसांवर सोपवली जाणार आहे.
अलाहाबादमधील कुंभमेळ्यात 'चारित्र्यवान' पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे. यासाठी अलाहाबादबाहेरील पोलिसांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलीस तैनात असणार आहेत. याची सुरुवात ऑक्टोबरपासून होईल. पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानदेखील कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी हजर राहतील. कुंभमेळाव्याच्या सुरक्षेसाठी तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येणार आहे. वयाची पस्तिशी उलटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे बंदोबस्ताची जबाबदारी दिली जाणार नाही.
कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी डीआयजी के. पी. सिंह यांनी बरेली, बदायू, शाहजहापूर आणि पिलीभीतमधील पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सिंह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं आहे. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी शाकाहारी, निर्व्यसनी आणि मृदूभाषी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. जवळपासच्या पोलीस ठाण्यांकडून कर्मचाऱ्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र आल्यावरच त्यांना कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे.