सर्व सैनिकांसाठी ओआरओपी

By admin | Published: September 7, 2015 02:02 AM2015-09-07T02:02:25+5:302015-09-07T02:02:25+5:30

सरकार लष्कराचा सर्वतोपरी सन्मान करते. सर्व माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’चा (ओआरओपी) लाभ दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फरिदाबाद येथे केली

OOP for all the soldiers | सर्व सैनिकांसाठी ओआरओपी

सर्व सैनिकांसाठी ओआरओपी

Next

नवी दिल्ली/फरिदाबाद : सरकार लष्कराचा सर्वतोपरी सन्मान करते. सर्व माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’चा (ओआरओपी) लाभ दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फरिदाबाद येथे केली. या मुद्यावर विरोधकांनी जवानांना भ्रमित करण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, माजी सैनिकांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले उपोषण मागे घेत असल्याचे मात्र मुख्य मुद्दे सोडविले जाईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले.
दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये बदरपूर- मुजेसर मेट्रो रेल्वेमार्गाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीरसभेत बोलताना मोदींनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. ओआरओपीचा मुद्दा गेल्या ४२ वर्षांपासून भिजत घोंगडे बनला होता. कोणत्याही सरकारला हा वाद निकाली काढण्याचे धाडस करता आले नाही. याआधीच्या प्रत्येक सरकारने या मुद्याचा उल्लेख केला; मात्र त्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत, असे ते म्हणाले.
रेवाडी येथील निवडणूक प्रचार सभेत मी वन रँक वन पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण केले आहे. नाईलाजास्तव लष्कराची सेवा सोडणाऱ्या जवानांनाही त्याचा समान लाभ मिळेल. माजी सैनिकांना किती रक्कम द्यावी लागणार, याचा यापूर्वीच्या सरकारांना अंदाज लावता आला नाही, त्यामुळे ३०० कोटी ते ५०० कोटींचा अंदाज लावून चर्चा थांबत होती.
आमच्या सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली. हा निधी अपुरा पडणारा आहे. त्यामुळे सरकारने ८ ते १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेतील त्रुटी दूर केल्या जातील, त्यासाठी चुका दुरुस्त करण्याचे काम समितीकडे सोपविण्यात आले आहे. किमान १५ वर्षे नोकरी करणाऱ्या तसेच सेवेत असताना गंभीर जखमी होऊन नोकरी सोडाव्या लागणाऱ्या सैनिकांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
मेट्रोमधून प्रवास
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सॅटेलाईट सिटी फरिदाबादला जोडणाऱ्या बदरपूर लाईन एक्स्टेंशनचे उद्घाटन करण्यासाठी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. जनपथ स्थानकावरून ते सकाळी १० वाजता मेट्रोमध्ये बसले. फरिदाबादच्या बाटा चौक स्थानकापर्यंत त्यांनी प्रवास केला. याआधी ते हेलिकॉप्टरने जाणार
होते. त्यांनी अचानक मेट्रोची
निवड केल्याने अधिकाऱ्यांसह प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. काही उत्साही प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढून
घेतल्या. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, वीरेंद्रसिंग, राव इंदरजितसिंग आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रमुख मंगूसिंग हेही होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: OOP for all the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.