अरेरे.... 'सेल्फी विथ डॉटर'मध्ये छापला दिग्विजय सिंह व 'ती'चा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2015 10:59 AM2015-07-02T10:59:16+5:302015-07-02T12:43:03+5:30
भारतातील सेल्फी विथ डॉटर या मोहीमेवर वृत्त प्रकाशित करणा-या एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने चक्क दिग्विजय सिंह व एका महिला पत्रकाराचा फोटो छापल्याचा प्रकार समोर आला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारतातील 'सेल्फी विथ डॉटर' या मोहीमेवर वृत्त प्रकाशित करणा-या एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने चक्क दिग्विजय सिंह व एका महिला पत्रकाराचा फोटो छापल्याचा प्रकार समोर आला आहे. वृत्तपत्राला ही चुक लक्षात आल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून यावर दिग्विजय सिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह व पत्रकार अमृता राय यांचे काही खासगी छायाचित्र गेल्या वर्षी सोशल मिडीयावर लीक झाले होते. यानंतर दिग्विजय सिंह यांनी अमृता राय यांच्याशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्त्री पुरुष जन्मदरातील दरी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी विथ डॉटर या मोहीमेची सुरुवात केली होती. यात पित्याने मुलीसोबतचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न होता व या आवाहनाला आता चांगलाच प्रतिसाद मिळत असून आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनेही याची दखल घेतली आहे.
एका तरुणीने दिग्विजय सिंह यांना चिमटा काढण्याच्या नादात त्यांचा व अमृता राय यांचा फोटो ट्विटवर टाकला. त्याखाली सेल्फी विथ डॉटर एज गर्लफ्रेंड (मुलीच्या वयाच्या प्रेयसीसोबतची सेल्फी) असा संदेश लिहीला होता. न्यूयॉर्क टाइम्सला या फोटोमधील विनोद समजलाच नाही व त्यांनी सेल्फी विथ डॉटर या बातमीत चक्क दिग्विजय सिंह व अमृता रायचा फोटो प्रकाशित केला. याप्रकाराची सोशल मिडीयावर चर्चा रंगताच न्यूयॉर्क टाइम्सने फोटो हटवला असून या प्रकारावर दिलगिरीही व्यक्त केली आहे.