खुली चर्चा - शास्त्रज्ञांचीच ‘मिशन शक्ती’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:22 AM2019-03-31T08:22:50+5:302019-03-31T08:23:38+5:30

भारताने ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची कामगिरी फत्ते केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

Open discussion - scientists 'mission power' | खुली चर्चा - शास्त्रज्ञांचीच ‘मिशन शक्ती’

खुली चर्चा - शास्त्रज्ञांचीच ‘मिशन शक्ती’

googlenewsNext

भारताने ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची कामगिरी फत्ते केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. या अतुलनीय कामगिरीचे श्रेय अर्थातच डीआरडीओ आणि इस्रो या अंतराळविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेतील शास्त्रज्ञांनाच जाते, यावर सर्वच वाचकांंनी मोहर उठविली आहे. मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करणे कितपत योग्य आहे, या प्रश्नावर मतमतांतरे असली तरी मोहिमेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र मोदी सरकारकडून नक्कीच होतोय, असे बहुतांश वाचकांना वाटते आहे. राजकीय स्टाईलने झालेली घोषणा अनेकांना रुचलेली नाही. अशोभनीय दिखावा करण्यापेक्षा माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी घालून दिलेल्या आदर्श मार्गाने वाटचाल केलेलीच चांगली, असे वाचकांनी सुचविले आहे.


आपण स्वत:ला सुरक्षित करीत आहोत हे महत्त्वाचे

इस्रो आणि आपल्या मिसाइल विभागाने एकत्र केलेल्या कामाचा हा उत्तम परिणाम आहे. इस्रोने आजपर्यंत हवामान आणि भूगर्भाखालील कामासाठी योगदान दिले. उपग्रह सोडण्यात आले. मात्र आता ‘मिशन शक्ती’मुळे आपली संरक्षण सिद्धता साध्य झाली आहे. १९७४ आणि १९९८ मध्ये आपण जी अणुचाचणी केली; तेव्हा आपण हे काम करू शकतो हे सिद्ध झाले होते.

आज इस्रो संरक्षणात भाग घेऊ शकते हेदेखील सिद्ध झाले. एखाद्या उपग्रहावर एखाद्या क्षेपणास्त्राने हल्ला करणे हे तांत्रिक कौशल्य आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे कौतुक आहे. अमेरिका, चीन, रशिया यांच्या रांगेत चौथे राष्ट्र म्हणून भारताचा समावेश झाला आहे. निवडणुकीच्या काळात ही बाब समोर आल्याने पंतप्रधानांवर टीका होते आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अशी टीका करीत असलेल्यांना आपण महत्त्व देता कामा नये. पूर्वी युद्ध समोरासमोर होत होते. आता तांत्रिकदृष्ट्या युद्ध होत आहेत आणि आपण याबाबत स्वत:ला सुरक्षित करीत आहोत हे खूप महत्त्वाचे आहे.
मुळात कसे आह,े की हे तंत्रज्ञान खूप विकसित आणि अत्याधुनिक आहे. याचा वेग अफाट आहे. उपग्रह आणि क्षेपणास्त्र या दोघांचा वेग एकसमान आणून हे काम करणे म्हणजे अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यासारखे आहे. इस्त्रोने हे काम केल्याने साहजिकच ते कौतुकास पात्र आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करायचा झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीन या बलाढ्य देशांकडे हे तंत्र होते. आता या रांगेत भारतदेखील आला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव मोठे झाले असून, संरक्षण क्षेत्रात आपण आणखी बळकट झालो आहोत. याचा प्रत्येकास अभिमान असला पाहिजेच.


श्रेय घेण्याचे प्रयत्न केल्यास ते काळवंडते

‘मिशन शक्ती’सारखा उपक्रम संरक्षण सिद्धता करून देशाची शान वाढविणारा असतो. सरकारची इच्छाशक्ती, शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आणि सर्वसामान्य जनतेचे पाठबळ असल्याशिवाय, असे उपक्रम होणे नाही. यांसारख्या भाव्यदिव्य उपक्रमाचे यश श्रेयवादामध्ये अडकले की काळवंडते, हे खरेच.

मिशन शक्तीची यशस्वी चाचणी ही भारताला संरक्षण क्षेत्रात दिलासा देणारी आणि जगातील सामरिक महाशक्तींना ‘हम भी कुछ कम नही’ अशा संदेश पोहोचविणारी घटना आहे. आमचे शास्त्रज्ञ स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करू लागले असून इतर देशांच्या मदतीवर आमचे सामर्थ्य अवलंबून नाही, हेही सिद्ध करणारी बाब आहे. यात विज्ञान, तंत्रज्ञान, सरकारांची इच्छाशक्ती आणि जनतेचा पाठिंबा या जमेच्या बाबी आहेत. संशोधन ही निरंतर प्रक्रिया आहे. अंतराळक्षेत्रात भारतात इस्त्रो आणि डीआरडीओ गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.
भारताने पहिले अंतरिक्ष यान आर्यभट्ट १९७५ साली अंतराळात पाठविले. आज ४५ वर्षांनंतर भारताने आपल्या देशावर जासूसी करणाऱ्या उपग्रहांना नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, हा देशाच्या संरक्षणक्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. संशोधकांचे प्रयत्न जेव्हा फलद्रुप होतात तेव्हा त्याचे श्रेय आपोआप त्या-त्या काळातील सरकारला जाते. श्रेय घेण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यास श्रेय काळवंडते. यशवंतराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना उपदेश केला आहे, ‘ लोकशाहीत श्रेय मागून मिळत नाही, तसे ते नाकारुन जातही नाही’. या उक्तीची प्रकर्षाने आठवण होते. संशोधकांचे मन:पूर्वक अभिनंदन तसेच संशोधकांच्या पाठीशी उभे राहणाºया सर्वच सरकारांचेही अभिनंदन.

 

Web Title: Open discussion - scientists 'mission power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.