भारतीय संगीताला विमानाची दारं खुली करा!, प्रख्यात संगीतकारांची मंत्रीमहोदयांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:54 AM2021-12-27T06:54:57+5:302021-12-27T08:47:24+5:30
Indian Music : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्री शिंदे यांना भेटून एक आगळीवेगळी ‘तान’ ऐकविण्याची इच्छा व्यक्त केली.
मुंबई : रशियात गेल्यावर रशियन संगीत, तुर्कस्तानमध्ये गेल्यानंतर तुर्की संगीत त्या-त्या विमान प्रवासात ऐकायला मिळते. भारतीय विमानातून प्रवास करताना मात्र परदेशी संगीत का ऐकवायचे..? असा सवाल करीत देशातील मान्यवर संगीतकारांनी नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भारतीय विमानातून भारतीय संगीत ऐकविण्याची साद घातली आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्री शिंदे यांना भेटून एक आगळीवेगळी ‘तान’ ऐकविण्याची इच्छा व्यक्त केली. ती ‘तान’ होती भारतीय संगीतावरील प्रेमाची. ‘अशी सुंदर तान ऐकवायला तुम्ही माझ्याकडे येऊ नका, त्यासाठी मीच तुमच्याकडे येतो’, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील आयसीसीआरचे मुख्यालय गाठले. पाहता पाहता तेथे संगीताची मैफल सजली. पंडित संजीव अभ्यंकर, पंडित शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी पाटील, कौशल इनामदार ही मराठमोळी संगीत क्षेत्रातील नामवंत मंडळी तेथे होती.
त्याचप्रमाणे वसिफोद्दीन डागर, मालिनी अवस्थी, रिटा गांगुली, प्रख्यात संगीतकार अन्नू मलिक यांच्यासारखे संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संगीत दिग्दर्शक अनु मलिक म्हणाले की, विनय सहस्त्रबुद्धे यांनी या कामासाठी जेव्हा हाक दिली त्यावेळी मी धावत गेलो. भारतीय संगीतासाठी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मी जायला तयार आहे. त्यांनी एक अत्यंत चांगली मागणी केली आहे. ती पूर्ण झाली तर भारतीय विमान प्रवासात उत्तम दर्जेदार भारतीय संगीत ऐकायला मिळेल.
या मागणीवर आता मंत्री ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
ज्या देशात आपण जातो, त्या देशातले संगीत आपल्याला तिथल्या विमान प्रवासात ऐकायला मिळते. भारतात ही सुविधा आपण का देऊ शकत नाही? प्रत्येक गोष्टीसाठी नियमच केले पाहिजे असे नाही. नियमांपेक्षा भारतावरील आपले प्रेम आणि भारतीय संगीताबद्दलची आस्था या दोन गोष्टी पुरेशा ठराव्यात म्हणून आम्ही ही मागणी केली.
- विनय सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, आयसीसीआर
विमान प्रवासात भारतीय संगीत ऐकण्यास मिळणे ही एक अत्यंत अनोखी कल्पना आहे. लोकांनी चांगले संगीत ऐकले तर त्यांची आवड तयार होईल आणि तसेच संगीत वाजविणारेही समाजात तयार होतील.
- अनु मलिक, प्रख्यात संगीत दिग्दर्शक