चर्चेला तयार, पण चीनची दादागिरी नाही खपवून घेणार - भारत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 11:43 AM2017-07-26T11:43:04+5:302017-07-26T11:53:43+5:30
चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.
नवी दिल्ली, दि. 26 - चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. डोकलाममध्ये निर्माण झालेला वाद राजकीय आणि कुटनितीक चर्चेतून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न चालू राहिल पण त्याचवेळी चीनने भूतानवर दादागिरीचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चीनच्या भूतानवरील कोणत्याही दडपशाहीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची भारताची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
11 हजार फूट उंचीवर सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवर हळूहळू भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. परिस्थिती आणि गरजेनुसार इथे अतिरिक्त सैन्य तुकडीची तैनाती केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांमधून दररोज भारताला धमक्या, इशारे दिले जात असले तरी, भारताने कुटनितिक चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ट्राय जंक्शन येथे असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधणीचा प्रयत्न केल्यापासून या भागातील शांतता भंग पावली आहे.
युद्धकाळात लष्करी साहित्याची ने-आण करता येईल असा रस्ता इथे चीनकडून बांधला जात होता. पण भारताने त्यावर तीव्र आक्षेप घेत चीनला इथे रस्ता बांधणीपासून रोखले तेव्हापासून तणाव निर्माण झाला आहे. चीनने आपले सैन्य मागे घ्यावे आणि इथे जैसे थे परिस्थिती ठेवावी अशी भारताची मागणी आहे. पण चीन ऐकायला तयार नाही. भारताने पहिले सैन्य मागे घ्यावे तरच चर्चा करु अशी चीनची भूमिका आहे. आपण भूतानच्या भूमीवर आहोत हे चीनला अजिबात मान्य नाही. डोकलाम हा आपलाच भूभाग आहे असा चीनचा दावा आहे.
भारताने चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याची कबुली दिली आहे असा अजब दावा मंगळवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी केला.
सिक्कीमच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असताना आता गोंधळ निर्माण करण्यासाठी चीनकडून असे उलट-सुलट दावे केले जात आहेत. चूक काय, बरोबर काय ते सर्वांसमक्ष आहे. चिनी सैन्य भारताच्या हद्दीत घुसले नसून, अनेक भारतीय अधिका-यांनी जाहीरपणे ही बाब मान्य केली आहे असे वँग यांनी सांगितले.